डास निर्मित आजारांचा अटकाव करण्यासाठी शहादा फर्स्टच्यावतीने एकात्मिक डास निर्मूलन मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:29+5:302021-09-21T04:33:29+5:30

शहादा फर्स्टच्यावतीने शहरात विविध सामाजिक संस्था, समविचारी लोकांच्या समूहाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील विविध ...

Integrated mosquito eradication campaign on behalf of Shahada First to control mosquito-borne diseases | डास निर्मित आजारांचा अटकाव करण्यासाठी शहादा फर्स्टच्यावतीने एकात्मिक डास निर्मूलन मोहीम

डास निर्मित आजारांचा अटकाव करण्यासाठी शहादा फर्स्टच्यावतीने एकात्मिक डास निर्मूलन मोहीम

Next

शहादा फर्स्टच्यावतीने शहरात विविध सामाजिक संस्था, समविचारी लोकांच्या समूहाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कामे हाती घेण्यात आली आहेत. शहरातील विविध भागात श्रमदान, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम सुरू आहेत. त्यातच आता शहादा शहर व परिसरात विविध आजारांनी डोके वर काढले आहे. शहरातील अनेक दवाखान्यांमध्ये मलेरिया, डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांची संख्या दिसून येत आहे. डास निर्मित आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी शहादा फर्स्टच्या माध्यमातून एकात्मिक डान्स निर्मूलनाचे काम सुरू करावे, असे साप्ताहिक बैठकीत ठरविण्यात आले होते. त्यानुसार रविवारपासून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यात या मोहिमेची सुरुवात रविवारी सकाळी शहरातील वृंदावन नगरपासून करण्यात आली. शहादा फर्स्टच्या सर्व सदस्यांच्यावतीने वृंदावन नगरमध्ये डासांमुळे होणाऱ्या आजारांची माहिती देत त्यासाठी डास निर्मूलन किती महत्त्वाचे आहे याची माहिती नागरिकांना दिली. या भागातील घरांच्या छतावरील सेप्टीक टॅंकच्या गॅस पाईपला प्लास्टिकची जाळी सेंट्रींग तारच्या सहाय्याने बांधण्यात आली. जाळी पाईपला लावल्यामुळे सेप्टीक टॅंकमध्ये निर्मित होणारे डास पाईपमधून बाहेर येणार नाहीत. त्याचठिकाणी राहतील त्यामुळे डासांची संख्या कमी होईल. एकात्मिक पद्धतीने शहरातील प्रत्येक भागात हे केल्यास डास निर्मूलन मोहीम यशस्वी होऊन आजारांना आळा बसणार आहे.

शहर आपलं आहे, आपणही काही देणे लागतो या भावनेतून संपूर्ण सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता एक सुजाण नागरिक म्हणून आपणही या मोहिमेत खारीचा वाटा उचलू शकतो. फक्त जाळी घेऊन सेफ्टी टॅंकच्या गॅस पाईपला बांधायची आहे. शहादा फर्स्टच्यावतीने ही जाळी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. जाळी मिळविण्यासाठी शहरातील ओम ट्रेडर्स बोहरी मार्केट, विकास हायस्कूल ग्रंथालय विभाग, चंद्रकांत पान सेंटर सोनार गल्ली शहादा याठिकाणी उपलब्ध असून नागरिकांनी संपर्क साधून जाळी घेऊन जाण्याचे आवाहन शहादा फर्स्टच्यावतीने करण्यात आले आहे.

शहादा फर्स्टच्या समविचारी लोकांच्या माध्यमातून जनआरोग्य व स्वच्छता मिशन अंतर्गत डासनिर्मित आजारांचा अटकाव व्हावा म्हणून शहर व परिसरात एकात्मिक डास निर्मूलन मोहीम राबविण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार प्रातिनिधीक स्वरूपात वृंदावन नगरपासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. शहादा फर्स्टच्या माध्यमातून विनामूल्य जाळी उपलब्ध करून देण्यात आली असून नागरिकांनी ती मिळवून या मोहिमेत सहभागी व्हावे.

-अभिजित पाटील, माजी सभापती, जिल्हा परिषद, नंदुरबार

Web Title: Integrated mosquito eradication campaign on behalf of Shahada First to control mosquito-borne diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.