कोळदा ते सेंधवा दरम्यान वाहतुकीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:36 PM2018-01-12T12:36:29+5:302018-01-12T12:36:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आधीच वाहतुकीची कोंडी होत असताना एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून होणा:या ऊस वाहतुकीमुळे त्यात भर पडत आहे. त्यामुळे उसाची अशाप्रकारे वाहतूक करणा:या वाहनांवर कारवाई करून अशी वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे.
कोळदा ते सेंधवा दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी हे काम वेगात सुरू आहे. त्यामुळे साईडपट्टय़ांचे खोदकाम, फरशी पुलासाठी केलेले खड्डे वाहतुकीला अडथळा ठरत आहे. प्रकाशा ते लांबोळा दरम्यान रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यातच ऑस्टोरिया व सातपुडा साखर कारखान्यात ऊस वाहतुकीसाठी एका ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून उसाची वाहतूक करण्यात येत आहे. दोन ट्रॉलीमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची समस्या निर्माण होते. या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना इतर वाहन चालकांना दोन ट्रॉलींचा अंदाज येत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेळ व पैशांच्या बचतीसाठी मुकादमांकडून हा प्रकार होत असला तरी इतर वाहनधारकांसाठी ते त्रासदायक ठरत आहे. रात्रीच्यावेळी ऊस वाहतूक करणा:या काही बैलगाडी व ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर नसल्याने ही वाहने दिसत नाही. त्यामुळे रिफ्लेक्टर नसलेल्या व दोन ट्रॉली जोडून ऊस वाहतूक करणा:या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.