भांडणाात मध्यस्थी, सासूला जाळण्याचा जावयाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:51 AM2018-06-26T06:51:31+5:302018-06-26T06:51:33+5:30
पती-पत्नीच्या भांडणात सासू नेहमीच मध्यस्थी करून भांडण सोडविते. याचा राग येऊन जावयाने सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबारातील साक्रीनाका भागात घडली. घटनेत सासूबाई या गंभीर जळाल्या आहेत.
नंदुरबार : पती-पत्नीच्या भांडणात सासू नेहमीच मध्यस्थी करून भांडण सोडविते. याचा राग येऊन जावयाने सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना नंदुरबारातील साक्रीनाका भागात घडली. घटनेत सासूबाई या गंभीर जळाल्या आहेत.
पोलीस सूत्रांनुसार, नंदुरबारातील साक्रीनाका भागात राहणाऱ्या कमलाबाई अशोक चौधरी यांच्याकडे त्यांची मुलगी व जावई दीपक चौधरी राहतात. दोघा पती-पत्नीमध्ये नेहमीच भांडण होत होते. त्यात मध्यस्थी म्हणून सासूबाई कमलाबाई चौधरी राहत होत्या. त्याचा राग दीपक चौधरी यांना येत असे. त्या रागातूनच सासूचा काटा काढण्याचा बेत त्याने रचला. २४ रोजी दुपारी त्याने घरात सासू कमलाबाई चौधरी यांना कपाटातून आधारकार्ड काढण्याचे सांगितले. त्या आधारकार्ड काढण्यासाठी खाली बसल्याची संधी साधत त्याने शिवीगाळ करीत कमलाबाई यांचा गळा दाबला, दुसºया हातातील पेट्रोलची कॅन त्याच्या अंगावर ओतून जाळले. त्यात कमलाबाई चौधरी या गंभीर भाजल्या. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
याबाबत कमलाबाई अशोक चौधरी यांनी फिर्याद दिल्याने दीपक चौधरी यांच्याविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक के.जी. पवार व पोलीस उपनिरीक्षक आनंदा पाटील करीत आहेत.