नंदुरबारातील रिंगरोडचा मुद्दा ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:33 AM2021-09-18T04:33:05+5:302021-09-18T04:33:05+5:30

नंदुरबार : शहरातील वळण रस्त्याने एकाचा बळी घेतला आहे. या रस्त्याची चाळण झाली असून दुरुस्तीबाबत महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत ...

The issue of ring road in Nandurbar is on the agenda! | नंदुरबारातील रिंगरोडचा मुद्दा ऐरणीवर!

नंदुरबारातील रिंगरोडचा मुद्दा ऐरणीवर!

Next

नंदुरबार : शहरातील वळण रस्त्याने एकाचा बळी घेतला आहे. या रस्त्याची चाळण झाली असून दुरुस्तीबाबत महामार्ग प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात शहरवासीयांनी, विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा देऊन देखील दखल घेतली जात नाही. आणखी किती जिवांचा बळी जाण्याची वाट महामार्ग प्राधिकरण पाहणार आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शहराबाहेरून वळण रस्ता अर्थात रिंगरोड काढण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नंदुरबारातून शेवाळी-नेत्रंग व विसरवाडी-सेंधवा हे दोन महामार्ग गेले आहेत. या दोन महामार्गांची भविष्यातील रहदारी लक्षात घेता शहराबाहेरून वळण रस्ता काढणे आवश्यक असताना तसे कुठलेही नियोजन या महामार्गांच्या मंजुरीच्या प्रास्ताविकेत नाहीत. त्यामुळे आता असलेल्याच वळण रस्त्यावरच या दोन महामार्गांचा व इतर वाहतुकीचा ताण राहणार आहे. आता हा वळण रस्ता शहराच्या मध्यभागी आलेला आहे. अशा वेळी शहरवासीयांना भविष्यात किती आणि कसा त्रास सहन करावा लागेल याची प्रचिती येते. सध्या या वळण रस्त्याची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, परंतु दुरुस्तीबाबत महामार्ग प्राधिकरण डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. वाघेश्वरी चौफुली व करण चौफुलीवर मोठमोठे खड्डे पडूनही आणि मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होऊनही लक्ष दिले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गुरुवारी खड्ड्यांमुळेच एका व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे संतापात भर पडली आहे.

महामार्ग मंजूर करतात, दुरुस्तीसाठी पाठपुरावा का नाही

जिल्हा विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकप्रतिनिधींकडून जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने महामार्ग मंजूर केल्याचा डांगोरा पिटला जातो; परंतु त्यांच्या कामाबाबत पाठपुरावा केला जात नाही. शेवाळी-नेत्रंग महामार्ग व विसरवाड-सेंधवा महामार्ग मंजूर केला गेला. परिणामी हे रस्ते महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाले. महामार्ग प्राधिकरण महामार्ग बांधला जात नाही तोपर्यंत अशा रस्त्यांवर फारसा खर्च करीत नाही. त्याचेच उदाहरण नंदुरबारातील वळण रस्ता ठरला आहे. या रस्त्याची दुरुस्तीच केली जात नसल्याची स्थिती आहे. पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता असताना त्याची नियमित दुरुस्ती, डागडुजी केली जात होती; परंतु महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ता गेल्यानंतर त्यांची दुरुस्तीच होत नसल्याची स्थिती आहे. लोकप्रतिनिधी जसे महामार्गाचे श्रेय घेतात तसे दुरुस्तीबाबतही श्रेय घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

साईडपट्ट्याही नाही

आधीच या रस्त्याची रुंदी कमी आहे. त्यात साईडपट्टया खोल गेल्या आहेत. त्यामुळे दुचाकीचालक किंवा लहान वाहन रस्त्याच्या खाली उतरले तर घसरून पडते. त्यामुळे अपघात होत आहेत. परिणामी या रस्त्यावरून जाताना शहरवासीयांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत असते. महामार्ग प्राधिकरणाने रस्ता दुरुस्त करताना साईटपट्टया देखील तयार कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

खड्ड्यांचा बळी

गुरुवारी एका व्यक्तीचा खड्ड्यांमुळेच बळी गेल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. वळण रस्त्यावरील व्ही. जी. लॅान्सजवळील खड्डयात दुचाकी आदळून ती समोरून येणाऱ्या ट्रकखाली आल्याने संबंधित दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जर पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती झाली असती तर या व्यक्तीचा जीव वाचला असता असे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधिताच्या मृत्यूस महामार्ग प्राधिकरणास जबाबदार धरावे, अशी मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.

वळण रस्ता करावा

शहरातून दोन महामार्ग जात असल्यामुळे भविष्यातील रहदारीची समस्या लक्षात घेता शहराबाहेरून वळण रस्ता तयार करावा, अशी मागणी होत आहे. साक्रीकडून येणाऱ्या वाहनांसाठी जिल्हा रुग्णालयाच्या पलीकडे दुधाळे शिवार, भोणे शिवार, चौपाळे शिवार, होळ शिवार, पातोंडा शिवाय, वाघोदा शिवार असा एक वळण रस्ता व पथराई फाट्यापासून पथराई शिवार, लोणखेडा, नळवा, बिलाडी शिवार, खामगाव शिवारमार्गे नवापूरकडून येणाऱ्या रस्त्याला जोडला जावा. तेथून टोकर तलाव शिवारातून परत साक्रीकडून येणाऱ्या रस्त्याला तो जोडला जावा. जेणेकरून शहराबाहेरून रिंग रोड तयार होऊ शकतो. याबाबत पाठपुरावा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे गरजेचे आहे.

Web Title: The issue of ring road in Nandurbar is on the agenda!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.