नंदुरबारात जगदंबा देवी अवतार मिरवणूक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 07:24 PM2019-03-26T19:24:59+5:302019-03-26T19:27:47+5:30

नंदुरबार : होलिकोत्सवातील श्री जगदंबा देवी अवताराची मिरवणूक सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ...

Jagadamba Devi avatar procession in Nandurbar | नंदुरबारात जगदंबा देवी अवतार मिरवणूक उत्साहात

नंदुरबारात जगदंबा देवी अवतार मिरवणूक उत्साहात

googlenewsNext

नंदुरबार : होलिकोत्सवातील श्री जगदंबा देवी अवताराची मिरवणूक सोमवारी सायंकाळी उत्साहात पार पडली. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. रात्री उशीरा गणेश पंचायतन मंदीरात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
नंदुरबारातील होळी उत्सवाची परंपरा दोन शतकांपूर्वीची आहे. बालाजी संस्थानचा होळी उत्सव म्हणून त्याची ओळख होती. पाच दिवसांचा होळी उत्सव आगळावेगळा तितकाच ऐतिहासिक परंपरा जपणारादेखील होता. आता या उत्सवात कालानुरूप बदल झाला असला तरी त्याचा मूळ गाभा कायम आहे.
काही वर्षांपासून मांगल्य सेवा संस्थेतर्फे हा उत्सव साजरा केला जातो. हितेश उपासणी हे गेल्या काही वर्षांपासून देवीचा अवतार धारण करीत आहेत.
ग्रामजोशी यांच्या घरी देवी अवतार धारण करणाऱ्या व्यक्तीस सायंकाळी देवीची महावस्त्रे नेसविली गेली. पारंपरिक दागदागिने, पाटल्या, बांगड्या, तोडे, वाकी, पैंजण व तोरड्या आदी दागिने चढविण्यात आले. हे सर्व झाल्यावर देवीचा शृंगारित मुखवटा बांधण्यात आला. कंबरेला वाघाचे कडे, हातात दोन तलवारी, पायात घुंगरू धारण केल्यावर ‘या देवी सर्वभूतेषु... नमतस्यै नमतस्यै नमतस्यै नमो नम’ अशा ब्रह्मवृंदांनी केलेल्या सप्तशतीच्या मंत्रघोषात देवीला तयार करण्यात आली.
देवी अवतार बरोबरच लाल वस्त्र परिधान केलेला हातात जळते भळांदे घेतलेला देवीचा भोप्या देवीबरोबर नृत्य करीत होता. देवीची प्रथम पूजा करण्याचा मान ग्रामजोशी घराण्याचा असतो.
सायंकाळी सात वाजता सुरू झालेली मिरवणुक उशीरापर्यंत चालली. या दरम्यान शिवाजी चौकाच्या होळीला प्रदक्षिणा घालण्यात आली. तेथून जवळच असलेल्या होळी चौकातील स्टेजवर काहीकाळ देवीला विराजमान करण्यात आले. त्यानंतर जळका बाजार पोस्ट गल्ली, टॉवर समोर, बाजाराचा मुख्य चौक, टिळकपथ, कालाणी यांचे घर, शिरिष मेहता रोडवरील जनक आभूषण जवळ, सराफ बाजारातील फडके चौक, गुळवाडी, बालाजी वाडा, सोनारखुंट, संकट मोचन मारुती चौक, विठ्ठल मंदीर चौैक या ठिकाणी देवीने होळी प्रदक्षिणा करून दर्शन दिले. तेथून गणेश पंचायतन मंदीरात जावून तेथे विधीवत विसर्जन करण्यात आले.
यशस्वीतेसाठी मांगल्य सेवा संस्थेचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.पूर्वी हा उत्सव पाच दिवस चालत होता. बालाजी संस्थानतर्फे बालाजी वाड्यात होळीपासून पंचमीपर्यंत रात्री विविध कार्यक्रम होत होते. ते कार्यक्रम पहाण्यासाठी शहरासह ग्रामिण भागातील जनता येत होती. आता बालाजी संस्थानतर्फे केवळ देवीच्या अवतारांच्या मुखवट्यांचे पूजन करून ते दर्शनासाठी ठेवले जात असतात. त्यामुळे मांगल्य सेवा संस्थेतर्फे आता हा उत्सव साजरा केला जात आहे.

Web Title: Jagadamba Devi avatar procession in Nandurbar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.