अखेर जितेंद्र सापडला पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 01:46 PM2020-07-20T13:46:13+5:302020-07-20T13:46:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : देवमोगरा पुनर्वसन येथील अंगणवाडीतील ३४ हजाराच्या साहित्याची व कंकाळा येथील सौर प्लेटची चोरी करणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : देवमोगरा पुनर्वसन येथील अंगणवाडीतील ३४ हजाराच्या साहित्याची व कंकाळा येथील सौर प्लेटची चोरी करणाऱ्या संशयीतास एलसीबीने अटक केली आहे. त्याचे इतर चार साथीदार फरार झाले आहेत. ११ जुलै रोजी ही चोरी झाली होती.
जितेंद्र उर्फ जिता नेहरू पाडवी, रा.वाण्याविहीर, ता.अक्कलकुवा असे अटक करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे. तर त्याचे साथीदर उमेश उर्फ रिंगा टेट्या गावीत, संजय उर्फ भाऊ रणजीतसिंग पाडवी, संदीप रजेसिंग पाडवी, सुभाष कृष्णा गावीत सर्व रा.वाण्याविहिर असे त्यांची नावे आहेत.
देवमोगरा पुनर्वसन येथील अंगणवाडीचे कुलूप तोडून चोरट्यांनी एलईडी टिव्ही, प्रिंटर, बॅटरी असा एकुण ३४ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत अंगणवाडी सेविका गंगाबाई बाबा पाडवी यांनी अक्कलकुवा पोलिसात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चोरीचा तपास एलसीबीने देखील सुरू केला होता. गुप्त माहितीवरून वाण्याविहिर येथील जितेंद्र याने घरी एलईडी टिव्ही आणल्याचे समजले. हा टिव्ही अंगणवाडी येथील चोरीचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार एलसीबीने त्याची खात्री करून पथकाला जितेंद्रचा शोध घेण्यासाठी पाठविण्यात आले. तो गावातच आढळल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्याने चोरीची कबुली दिली. आपण ही चोरी आपल्या इतर चार साथीदारांसह केल्याचे सांगितले. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जितेंद्रला अटक झाल्याचे कळताच ते फरार झाले. याच टोळीने कंकाळा येथील २० हजार रुपये किंमतीच्या सौर प्लेटा देखील चोरल्याचे सांगितले.
पथकाने त्याच्याकडून एलईडी टिव्ही, इन्व्हर्टर, सौर उर्जा प्लेट आणि चोरीसाठी वापरलेली दुचाकी असा एकुण ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जितेंद्र नेहरू पाडवी यास अटक करून अक्कलकुवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई एसलबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार मुकेश तावडे, सुनील पाडवी, मनोज नाईक, मोहन ढमढेरे यांच्या पथकाने केली.