कानुबाई माता उत्सव साजरा न करण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 12:43 PM2020-07-21T12:43:00+5:302020-07-21T12:43:07+5:30
हितेश पटेल । लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : खान्देशचा पवित्र सण ‘कानुबाई माता उत्सव’ श्रावण महिन्यातल्या नागपंचमीनंतरच्या दुसऱ्या रविवारी ...
हितेश पटेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : खान्देशचा पवित्र सण ‘कानुबाई माता उत्सव’ श्रावण महिन्यातल्या नागपंचमीनंतरच्या दुसऱ्या रविवारी जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्याच्या काही भागात उत्साहात साजरा केला जातो. परंतु खान्देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता बामखेडा त.त., ता.शहादा येथे हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
कानुबाई माता उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. पूर्वी खानाचं राज्य होतं त्याला तुझ्या नावाची म्हणजे ‘खानबाई’ साजरी करतो, असं सांगून हिंदूंचा सण साजरा करत होते. तर कोणी म्हणतं खान्देश हा ‘कान्हा’चे म्हणजे श्रीकृष्णाला मानणारा म्हणून हा सण साजरा केला जातो. जरी इतिहास वेगवेगळा असला तरी हा उत्सव खान्देशात सर्व जातींमध्ये एकसमानप्रमाणे साजरा केला जातो व सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे बघितले जाते.
रोट पूजन
एकत्र कुटुंब असेल तर रोटसाठी घरातील लहान-मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची सव्वा मूठ असे धान्य म्हणजे गहू, हरभरा दाळ घेतली जाते. तेही गिरणीवाल्याला आधी सांगून म्हणजे पावित्र्य राखले जावे म्हणून आधी कल्पना देऊन गिरणीवरून दळून आणली जाते. पुरणपोळी, खीर, आमटी, गंगाफळ किंवा लाल भोपळ्याची भाजी असा स्वयंपाक करून तो रोट म्हणून कानुबाई मातेला नैवद्य दाखविला जातो. नंतर पूर्ण कुटुंब व भाऊबंदकी एकत्र बसून जेवण करतात. त्यामुळे कानुबाई माता आणि रोट उत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक आहे. खान्देशचे वैशिष्ट्य असलेल्या खापरवरच्या पुरणपोळ्या व साजूक तूप या उत्सवाचा आनंद वाढवतात. खान्देशच्या व्यतिरिक्त अन्यत्र कुठेही हा सण साजरा होत नाही, कृषी संस्कृतीशी नातं अधोरेखित करणारा हा सण उत्सव आहे.
कानुबाई परणून आणणे
पूर्वीच्या काळी एखाद्या खेड्यात ठरवून गावचे पाटील लोक गावोगावी आमंत्रण पाठवायचे. या घरातल्या बाईला काही कापलेले, भाजलेलं नाही, अंगावर एकही डाग नाही अशा सुवासिनींची निवड केली जायची. सासरी असल्या तरी सासरचे लोक घेऊन त्यांना घेऊन यायचे, त्या महिलंना वस्त्र-अलंकारांनी सजवायचे व त्यांची पूजा करायचे. पूर्ण गाव जेवण करायचे. एका एका टनाने पुरणपोळ्या स्वयंपाक केला जायचा. तिथे त्याठिकाणी सुवासिनींनी स्पर्श केलेले ‘नारळ’ घेऊन तोच वर्षानुवर्षे पूजेत वापरला जायचा.आता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावजवळच्या उमरखेडला कानुबाई मातेचे मंदिर बांधण्यात आले आहे. ज्यांना नवीन कानुबाई माता बसवायची असेल ते कुटुंब नारळ घेऊन तेथील मूर्तीला स्पर्श करुन घरी आणतात व नंतर त्याला स्वच्छ धुवून नथ, डोळे बसवून इतर पारंपरिक दागिनेही घालण्यात येतात. त्या नारळाची श्रावण महिन्यातल्या रविवारी कानुबाई माता म्हणून स्थापना केली जाते.
सामाजिक एकतेचे प्रतीक
दुसºया शहरात व गावात नोकरी, व्यवसाय, शेती आदीनिमित्त कुटुंबातील व भाऊबंदकीतील व्यक्ती श्रावण महिन्यात कानुबाई माता उत्सव व रोट उत्सवाच्या निमित्ताने आपआपसातले हेवेदावे विसरून गावाकडे येतात. कानुबाई उत्सव एकप्रकारे सामाजिक एकतेचे प्रतीक असून श्रावण महिन्यातल्या दुसºया रविवारी खान्देशात गावोगावी बाहेरून आलेल्या चाकरमान्यांमुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
कानुबाई माता उत्सवावर
कोरोनाचे सावट
जवळपास चार ते पाच महिन्यापासून पूर्ण देशात कोरोनाचे संकट वाढत चाललेले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, सार्वजनिक वाहतूक सर्व बंद आहेत. खान्देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव दिसता सण-उत्सव साजरा करण्यावरही शासनाने मार्गदर्शक सूचना ठरवून बंदी केली आहे. त्यामुळे यावर्षी होणारा श्रावण महिन्यातला कानुबाई माता उत्सव हा जवळपास जिल्ह्यात होणार नाही, असेच संकेत दिसत आहेत.
या उत्सवाच्या आधी पूर्वतयारी म्हणून घराला रंगरंगोटी देऊन सर्व घराची स्वच्छता केली जाते. ज्या घरी कानुबाई मातेची स्थापना करायची असते त्याठिकाणी सजावट केली जाते. चौरंग किंवा पाटावर कलश मांडून त्यावर पूर्वापार चालत आलेले नारळ ठेवले जाते. ज्याठिकाणी कानुबाई मातेची स्थापना झालेली असते त्या घरी जाऊन, ज्या घरी फक्त रोट असतात ते कुटुंब तिथे जाऊन रोटच्या नैवद्य दाखवून घरी येतात व पूर्ण कुटुंब एकत्र बसून रोट (जेवण) खातात. हे रोट फक्त कुटुंबातील व घरातील लोकच खातात. जर एका दिवसात ते रोट संपले नाही तर दुसºया दिवशी ते संपवले जातात. अगदी कुटुंबातील लग्न झालेल्या मुलीलाही हा प्रसाद वर्ज्य असतो. दुसºया दिवशी सोमवारी वाजत-गाजत कानुबाई मातेची अहिराणी भाषेतील गाणी म्हणत, महिला फुगडी खेळत, पुरुष, बाळगोपाळ वाद्याच्या तालावर नाचत कानबाई मातेची मिरवणूक काढतात. गावविहीर, तलाव वा नदीकाठी जाऊन यथोचित पूजाअर्चा व आरती करून उत्सवाची सांगता होते.