अतिदक्षता विभाग सुसज्ज ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 12:52 PM2020-03-23T12:52:57+5:302020-03-23T12:53:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : परदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षणानिमित्त व उद्योग व्यवसायासह नोकरीनिमित्त राहणाऱ्या शहादेकर नागरिकांची संख्या जिल्ह्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : परदेशासह देशाच्या विविध राज्यांमध्ये शिक्षणानिमित्त व उद्योग व्यवसायासह नोकरीनिमित्त राहणाऱ्या शहादेकर नागरिकांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असल्याने सर्वत्र लॉकडाऊनसारखी परिस्थिती असल्याने विविध भागात राहणारे नागरिक येत्या काही दिवसात शहाद्यात मोठ्या संख्येने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभाग सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शहादा शहरात खाजगी रुग्णालयांची संख्या सर्वाधिक असून बहुतांश रुग्णालयाकडे अद्ययावत अतिदक्षता विभाग कार्यरत आहेत. राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण सर्वाधिक आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांनी ३१ मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १४४ कलम लागू करून लोकांचे आदेश दिले आहेत. राज्यातील अनेक विद्यार्थी मुंबई-पुणे व राज्याच्या इतर भागात शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. त्याचप्रमाणे अनेक नागरिक उद्योग-व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. ते शहाद्याकडे परत येत आहेत. गेल्या आठवड्यात अनेक नागरिक व विद्यार्थी परदेशासह मुंबई, पुणे येथून शहाद्यात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी शहरातील खाजगी रुग्णालयांशी संपर्क साधून तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून अतिदक्षता विभागातील आयसोलेशन बेड तयार करण्यासह आवश्यक ती यंत्रसामग्री व व्हेंटीलेटर तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याठिकाणी शासकीय वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे पथक कार्यरत असणार असून ते संबंधित संशयित कोरोनाग्रस्त रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतील. राज्यात पुणे, मुंबई व नागपूर या तीन ठिकाणी तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. दुर्दैवाने तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यास या अतिदक्षता विभागात संबंधित रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा केली जाणार आहे.
दरम्यान, परदेशातून व राज्यासह परराज्यातून शहाद्यात परतणाºयांची संख्या गेल्या चार-पाच दिवसात वाढली आहे. अशा नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी आपापली वैद्यकीय तपासणी स्वत:हून करून घ्यावी. त्याचप्रमाणे पुढील १५ दिवस कुठल्याही सार्वजनिक उपक्रमात शोभायात्रा व कार्यक्रमात हजर राहू नये. जे विद्यार्थी व नागरिक या आदेशाचा भंग करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.