खान्देश लोककला महोत्सव ठरला लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:03 PM2018-02-26T13:03:54+5:302018-02-26T13:03:54+5:30

Khandesh Festival of Folk Arts Festival | खान्देश लोककला महोत्सव ठरला लक्षवेधी

खान्देश लोककला महोत्सव ठरला लक्षवेधी

googlenewsNext


लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील असलोद येथे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने खान्देश लोककला महोत्सव 2018 उत्साहात झाला. ग्रामीण भागातील कलावंतांनी सादर केलेल्या भजने, भारुडे, एकतारी भजन यामुळे प्रेक्षक भारावून गेले. ग्रामीण संस्कृतीचे व विविध कला दर्शनाने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. निस्वार्थ भावनेने कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणा:या कलाकारांना सरकारने जाचक अटी शिथील करून भरघोस मानधन दिल्यास ग्रामीण कला संस्कृती जीवंत राहण्यास मदत होईल, असा सूर या महोत्सवातून व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यात प्रथमच हा लोककला महोत्सव असलोद येथील संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाच्या प्रयत्नाने भरविण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे, मंडळाचे प्रदेश महासचिव शोभाबाई खैरनार, प्रदेश सदसञया सरुबाई महाजन, जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, तालुकाध्यक्ष छोटू शिंदे, पं.स. सदस्य लगन पावरा, भैय्या वानखेडे, सरपंच बेबीबाई सोनवणे उपस्थित होते.
कलावंतांचा गुणगौरव
महोत्सवाच्या प्रारंभी नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शाहीर, भारुड कलावंत, कीर्तनकार, भजन कलावंत अशा 25 कलावंतांचा गुणगौरव मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन मंडळाच्या पदाधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहभागी झालेल्या प्रत्येक भजनी मंडळ कलावंतांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कला सादरीकरणाने प्रेक्षक भारावले
या लोककला महोत्सवात संपूर्ण खान्देशातून सुमारे तीन हजार कलावंत सहभागी झाले होते. त्यात धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, पारोळा, निजामपूर या भागातील कलावंतांनी हजेरी लावून आपली कला सादर केली. त्यात एका कलापथकाने सादर केलेले समाज जागृतीपर भारुडाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. तसे आदिवासी भागातून आलेल्या भजनी मंडळांनीही एकतारी भजने सादर करून सर्वाना आकर्षित केले. अनेक भजनी मंडळातील कलावंतांनी उत्कृष्टपणे भजने सादर केली. सर्व साहित्यानिशी पेटी, तबला, टाळ, मृदुंग यासह कलावंतांनी हजेरी लावल्याने कार्यक्रमात मोठी भर पडली.
मान्यवरांची उपस्थिती
महोत्सवात भजनांचा कार्यक्रम सुरू असताना सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, नगरसेवक प्रकाश ठाकरे आदींनी हजेरी लावली. याप्रसंगी राजेंद्रकुमार गावीत यांनी ग्रामीण भागात एवढे चांगले कलावंत असताना कला अकादमीच्या माध्यमातून त्यांची दखल घेतली गेली नाही याबाबत खंत व्यक्त करून महोत्सवात सहभागी कलावंतांचे कौतुक केले. खेडेगावात राहून भजने, कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून समाज जागृतीचे खरे कार्य करीत लोककला जीवंत ठेवण्याचे काम पिढय़ान्पिढय़ा सुरू ठेवूनही समाजात कशा कलाकारांना किंमत दिली जात नाही. यापुढे अशा कलावंतांची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी लोककला महोत्सवाच्या आयोजनाबाबत प्रशंसोद्गार काढून या महोत्सवामुळे कलाकारांच्या कलेचे ख:या अर्थाने दर्शन घडते. खेडेगावात भजनासह भारुड, गवळण सादर करणा:या कलाकारांचे समाजात मोठे योगदान असते. त्यांच्या निस्वार्थी सेवेची सरकारने गंभीरपणे दखल घेऊन अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मानधनात वाढ केली पाहिजे, असे सांगितले. दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
या महोत्सवाची सांगता ज्ञानेश्वर भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनाने झाली. महोत्सव यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष शेणू पाटील, प्रवीण गिरासे, देवेसिंग गिरासे, संतोष चव्हाण, रमेश पवार, लिंबा पवार, गणेश निकम, रतिलाल लोहार, धर्मा मराठे, दिलीप राजभोज, तालुकाध्यक्ष छोटू शिंदे व ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक गिरासे यांनी तर आभार नानाभाऊ शिंदे यांनी मानले.

Web Title: Khandesh Festival of Folk Arts Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.