पुढील आठवड्यापासून नंदुरबारातही कोविड तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 11:38 AM2020-07-04T11:38:38+5:302020-07-04T11:40:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे येथील कोविड तपासणी प्रयोगशाळेवर पडणारा ताण आणि जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे येथील कोविड तपासणी प्रयोगशाळेवर पडणारा ताण आणि जिल्ह्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता नंदुरबारातही पुढील आठवड्यापासून कोविड तपासणी प्रयोगशाळा सुरू होत आहे. त्यासाठी लागणारी टूनॅट हे उपकरण देखील रविवारपर्यंत येथे पोहचणार आहे. या बाबीला खासदार डॉ.हिना गावीत यांनीही दुजोरा दिला.
नंदुरबारात कोविड तपासणी प्रयोगशाळा यापूर्वीच मंजुर आहे. परंतु ती सुरू करण्यासाठी लागणारी यंत्र सामुग्री येथे उपलब्ध नव्हती. त्याकरीता पाठपुरावा सुरू होता. गेल्या चार दिवसात धुळे येथील प्रयोगशाळेतून जिल्ह्यातील एकही स्वॅब तपासणी झाली नाही. त्यामुळे ओरड झाली. संशयीत रुग्णांमध्ये चलबिचलता निर्माण झाली. क्वॉरंटाईन केलेल्या लोकांचे देखील स्वॅब घेतले गेले नाहीत. त्यामुळे नंदुरबारात स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली होती.
नंदुरबारला प्रयोगशाळा सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कोविड तपासणीसाठी लागणारे उपकरण अर्थात टूनॅट मशीन हे नंदुरबारसाठी रवाना झाले आहे. रविवारपर्यंत हे मशीन येथे उपलब्ध होईल. प्राथमिक तयारीनंतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती होऊन मंगळवार किंवा बुधवारपासून येथे कोविड तपासणीला सुरुवात होणार आहे.
याबाबत खासदार डॉ.हिना गावीत यांनी देखील त्याला दुजोरा दिला असून लवकरात लवकर स्वॅब तपासणी सुरू व्हावी यासाठी संबधितांना सुचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे धुळे किंवा इतर ठिकाणी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्याची गरज राहणार नसल्याचे सांगण्यात आले.