पुरेशा नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षणास अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:34 AM2021-09-12T04:34:50+5:302021-09-12T04:34:50+5:30

जयनगर : तालुक्यातील जयनगर येथे मोबाईलच्या पुरेशा नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणास अडथळा निर्माण होत आहे. सध्याचे युग हे विज्ञान व ...

Lack of adequate network hinders online learning | पुरेशा नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षणास अडथळा

पुरेशा नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षणास अडथळा

googlenewsNext

जयनगर : तालुक्यातील जयनगर येथे मोबाईलच्या पुरेशा नेटवर्कअभावी ऑनलाईन शिक्षणास अडथळा निर्माण होत आहे.

सध्याचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्षात शाळा चालू न झाल्यामुळे अजूनही विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणास सामोरे जावे लागत आहे. मात्र, जयनगर येथे खाजगी टॉवर असून शेजारील निंभोरे गावातही खाजगी मोबाईल टॉवर आहे. जयनगर ते निंभोरे या दोन गावा दरम्यान फक्त नदी आड येते. मात्र, तरीदेखील येथे पुरेशा प्रमाणात नेटवर्क मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेताना खूप अडथळा निर्माण होत आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी अँड्रॉईड मोबाईल खरेदी करून दिला आहे. अद्यापपर्यंत जयनगर तसेच निंभोरे गावात असलेल्या मोबाईल टॉवरमुळे चांगल्या प्रमाणात नेटवर्क मिळत होते. मात्र, मागील आठ ते १० दिवसांपासून सध्या नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणास तर इतर लोकांना नेटवर्क अभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

अनेकदा नेटवर्क गायब होत असल्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेर गल्लीत अथवा धाब्यावर पुरेसे नेटवर्क मिळण्यासाठी धावपळ करावी लागते. व्यवस्थित नेटवर्क मिळत नसल्यामुळे ऑनलाइन शिक्षणात जॉईन होताना खूपच उशीर लागत असल्याचे निदर्शनास येत आहे. ऑनलाइन शिक्षणच नाही तर अनेक जण फोन पे, गुगल पेच्या माध्यमाने आर्थिक व्यवहार करीत असतात. त्यांनाही पैसे ट्रान्सफर करताना अडचण निर्माण होत आहे. शासनाने अनेक सुविधा ऑनलाइन केल्या आहेत. त्यात वीज बिल भरणे, रिचार्ज मारणे यासारख्या गोष्टी घरबसल्या होत असतात. मात्र, येथे आठ ते १० दिवसांपासून पुरेसे नेटवर्क नसल्यामुळे धाब्यावर अथवा गल्लीमध्ये येऊन लोकांना ऑनलाइनचे कामे करावी लागत आहे.

आता ऑनलाईन शाळा चालू होऊन तीन महिने उलटल्यावर विद्यार्थ्यांची दुसरी घटक चाचणी चालू होणार आहे. अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणात पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी, व्हाट्सॲपवर व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी पुरेशा नेटवर्कची आवश्यकता असते. मात्र, जयनगर येथे घरात पुरेसे नेटवर्क मिळत नाही. गावातील अनेक मुले शहादा, वडाळी, बामखेडा येथे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असतात. तसेच अनेक विद्यार्थी शहादा तसेच लोणखेडा महाविद्यालयात आपले उच्च शिक्षण घेत आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांना नेटवर्कच्या समस्येमुळे सध्या शिक्षण घेताना खूपच अडथळा निर्माण होत आहे.

गणपतीची आरतीसाठी नेटवर्क नाही

सध्या गणेश उत्सव चालू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे मोजक्या लहान - लहान बालकांनी आपल्या घरातच गणरायाची छोटी मूर्तीची स्थापना केली आहे. ब्राह्मणाला घरोघरी आरतीसाठी जाता येत नसल्यामुळे डिजिटलच्या धर्तीवर लहान - लहान बालके युट्युबवर संकटमोचन गणरायाची आरती लावत आहेत. मात्र, त्यासाठीही पुरेसे नेटवर्क मिळत नसल्यामुळे आरतीच्या वेळेस एका मुलाला ओट्यावर अथवा अंगणात उभे राहून युट्युबवर आरती लावावी लागते.

Web Title: Lack of adequate network hinders online learning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.