स्थानिक परिसरात रोजगाराचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:31 AM2021-09-19T04:31:25+5:302021-09-19T04:31:25+5:30
रांझणी : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात स्थानिक परिसरात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब सप्टेंबर महिन्यातच मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत होत असून, ...
रांझणी : तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात स्थानिक परिसरात रोजगार नसल्याने अनेक कुटुंब सप्टेंबर महिन्यातच मोठ्या प्रमाणावर स्थलांतरीत होत असून, गुजरात, सौराष्ट्र तसेच महाराष्ट्रातील पुणे, पंढरपूर जिल्ह्यात रोजगारासाठी जाण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातून दरवर्षी रोजगारासाठी स्थलांतर होत असले तरी यावर्षी कापूस, ज्वारी, सोयाबीन या सारखी खरीप पिकांची अवस्था खराब असल्याने एकरी उत्पन्नात घट येणार असल्याने रोजगार मोठ्या प्रमाणावर मिळण्याच्या आशाही धूसर असल्याने आतापासूनच अनेक कुटुंबे स्थलांतरित होऊ लागली आहेत.
दरम्यान, तालुक्यात रोजगार हमी योजना, मनरेगा सारख्या रोजगाराच्या योजना प्रभावीपणे न राबवण्यात येत असल्याने स्थलांतर मोठ्या प्रमाणावर हाेत असल्याचे बोलले जात असून, स्थानिक परिसरात हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गांभीर्याने लक्ष देण्याबाबत अपेक्षा व्यक्त होत आहे.
एकंदरीत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतराचा परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरही होणार असून, किराणा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, पिठाची गिरणी, सलून व्यवसाय यावरही होणार असून, आतापासूनच व्यावसायिकांना झळ बसू लागली आहे.
येत्या आठवडाभरात तालुक्यातील बऱ्याच गावातील ग्रामस्थ रोजगारासाठी रवाना होणार असून, गावे ओस पडू लागली आहेत.
पाल्यांचेही शैक्षणिक नुकसान
बहुतांश कुटुंबे स्थलांतरित होत असताना त्यांच्या सोबत शिक्षण घेणारे त्यांचे पाल्यही स्थलांतरीत होऊ लागल्याने ते शाळा व ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहणार असून, आधीच गेल्या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शिक्षणात व्यत्यय आल्याने आता स्थलांतरामुळे त्यांचे शैक्षणिक व भवितव्य अंधारात आले असून, याबाबत ठोस उपाययोजना करण्यात याव्या, अशी अपेक्षा जाणकारांकडून व्यक्त होत आहे.