एस.टी.बस सेवेअभावी ग्रामिण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:16 PM2020-12-08T13:16:43+5:302020-12-08T13:16:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन तिसरा आठवडा उजाडला तरी अद्याप ग्रामिण भागातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील नववी ते बारावीच्या शाळा सुरू होऊन तिसरा आठवडा उजाडला तरी अद्याप ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी एस.टी.बस सेवा व त्यासाठीची पास सेवा सुरू न झाल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहत आहेत. त्यामुळे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तातडीने बससेवा व पास सेवा सुरू करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. परंतु आता उपस्थितीत वाढ झाली आहे. पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही कोरोनाची भिती हळूहळू कमी होऊ लागली आहे. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. असे असले तरी केवळ शहरी भागातील विद्यार्थीच शाळांमध्ये हजर राहत आहेत. ग्रामिण भागातून ये-जा करणारे विद्यार्थी अद्यापही शाळांपासून वंचीत आहेत. त्याला कारण ग्रामिण भागात सार्वजिनक प्रवासी वाहतुकीची वाहने नसल्याचे दिसून येत आहे. एस.टी.महामंडळाने ग्रामिण भागातील बस फेरऱ्यांमध्ये अद्यापही वाढ केलेली नाही. ज्या गावात बसेस जातात तेथील विद्यार्थ्यांना मात्र दररोज भाडे खर्चून यावे लागते. त्याला कारण विद्यार्थी बस पास दिल्या गेल्या नसल्याचे समोर येत आहे.
याबाबत अनेक शाळांनी एस.टी.आगाराकडे पास उपलब्ध करून द्याव्या व काही भागात एस.टी.च्या फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी केली आहे. परंतु त्याची फारशी दखल घेतली जात नसल्याचे चित्र आहे. दररोज भाडे खर्च करून परवडणारे नसल्याने पालक देखील विद्यार्थ्यांना शाळेत पाठवीत नसल्याचे चित्र आहे. सर्वाधिक नुकसान विद्यार्थीनींचे होत आहे. विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शहरात येतात किंवा गावी जाऊ शकत आहेत. विद्यार्थींनीना मात्र अनेक मर्याद येत असल्याने आणि पालकही धजावत नसल्यामुळे त्यांचे नुकसान होत आहे. सामान्य एस.टी.च्या फेऱ्यांसह मानव विकास मिशनच्या विद्यार्थींनींसाठीच्या बसेस देखील बंद आहेत. त्या देखील तातडीने सुरू करणे आवश्यक आहे.
या सर्व प्रकारामुळे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे सर्वाधीक शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा लवकरात लवकर अभ्यासक्रम संपविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यानंतर सराव परीक्षांना सुरूवात करणार आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू केल्याने शाळांनी ॲानलाईन क्लास देखील बंद केला आहे. त्यामुळे शाळेत न येऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.