नंदुरबार वन विभागात मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहाराचा अंदाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 11:48 AM2017-10-28T11:48:02+5:302017-10-28T11:48:02+5:30
वन विभागाच्या मस्टरवर एकाच व्यक्तीचे अंगठे !
रमाकांत पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार वन विभागातील कामांमध्ये मृत मजूर व एकच मजूर एकाच वेळी दोन ठिकाणी काम करीत असल्याचे मस्टर उघडकीस आल्यानंतर याच विभागात इतर अनेक कामांमध्ये अशीच पुनरावृत्ती घडल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी 2012 च्या कामातील तक्रारीबाबत वन विभागाने मजुरांचे ठसे तपासणी केले असता एकाच व्यक्तीने मजुरांची नावे लिहून अंगठे केल्याचे समोर आले आहे.
नंदुरबार वन विभागातील विविध कामांबाबत सातत्याने गैरव्यवहाराच्या तक्रारी झाल्या आहेत. यासंदर्भात चौकशीही झाल्या असून काही प्रकरणात गुन्हेही दाखल झाले आहेत. अंबापूर, ता.नंदुरबार येथील कक्ष क्रमांक 151 ते 153 मध्ये 22 जानेवारी 2012 ते 30 जानेवारी 2012 या कालावधीत झालेल्या कामांची चौकशी वरिष्ठ पातळीवर नुकतीच झाली आहे.
या कामावर बोगस मजुर दाखवून अंगठे केल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार चौकशी अधिकारी, विभागीय वन अधिकारी (दक्षता) यांनी संबधीत मजुरांना कार्यालयात बोलवून त्यांच्या अंगठय़ाचे ठसे घेतले होते. हे ठसे तपासणीसाठी पुणे येथील पोलीस अधीक्षक अंगुली मुद्रा केंद्राकडे पाठविले होते. त्यांनी अंगठय़ाच्या ठशांची तपासणी करून अहवाल दिला असून त्या अहवालात हजेरी पत्रकातील ठसे व प्रत्यक्ष मजुरांनी केलेले ठसे जुळत नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे. या मजुरांच्या नावासमोर उमटवलेले ठसे हे एकाच व्यक्तीने केल्याचा निष्कर्षही अहवालात देण्यात आला आहे.
एकुणच या प्रकरणासह अनेक कामांबाबत तक्रारी वाढत आहेत. बहुतांश कामांच्या मस्टरवर बोगस मजुर दाखविण्याचे प्रकार घडल्याचे आता उघड होत आहे. त्यामुळे या प्रकरणांची व्यापकता लक्षात घेवून वन विभागातील वरिष्ठ अधिका:यांनी आता ठोस कारवाईची गरज आहे.