सारंगखेडा यात्रेला प्रारंभ : नवस फेडण्यासाठी गर्दी, दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी दिवसभर रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:27 AM2017-12-04T11:27:03+5:302017-12-04T11:27:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सारंगखेडा : एकमुखी दत्ताच्या ऐतिहासिक यात्रोत्सवास रविवारपासून सुरूवात झाली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दत्तप्रभूंचे दर्शन घेतल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अजरुन सोमजी पाटील, सचिव भिक्कन पाटील व शिरीष पाटील यांनी दिली.
रविवारी पहाटे दोन वाजेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. तीन वाजेच्या सुमारास दत्त महाराजांची विधीवत पूजा करण्यात आली. प्रारंभी पंचामृत स्नान सोहळा व विधीवत पूजाअर्चा करून मंदिर साडेचार वाजेपासून भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. याठिकाणी महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, मंदिरापासून ते थेट पुलार्पयत रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
येथील दत्त मंदिरास महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या अधिका:यांनी भेट देऊन दत्त महाराजांचे दर्शन घेतले. प्रारंभी चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते विविधत दत्त महाराजांची पूजा करण्यात आली. याप्रसंगी पर्यटन विकास विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, कार्यकारी अभियंता हेमंत जगताप, उपअभियंता फारूख शेख, दशरथ मोठाड, महेश बागूल, सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार उपस्थित होते.
या अधिका:यांनी यात्रोत्सवातील टेन्टसिटी, महिला कट्टा, घोडेबाजार, मंदिर परिसर, चेतक फेस्टीवल कार्यालय आदींची पाहणी केली. गेल्यावर्षापेक्षा अतिशय नियोजनबद्ध व सुंदर अशा फेस्टीवलचे आयोजन केल्याने पर्यटन विभाग व चेतक फेस्टीवलचा ख:या अर्थाने उद्देश सफल झाल्याचे सांगत या महोत्सवामुळे देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पर्यटन विभागाकडून जास्तीत जास्त सहकार्य करून ही यात्रा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी आपण कट्टीबद्ध असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक राठोड यांनी सांगितले.
महाआरती सोहळा
एकमुखी दत्त यात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हजारो भाविकांच्या साक्षीने दत्त मंदिर प्रांगणात महाआरतीचा कार्यक्रम झाला. महाआरतीसाठी पंचक्रोशीतील तीन हजाराहून अधिक भाविकांनी सहभाग नोंदविला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. दत्त मंदिर ट्रस्ट व चेतक फेस्टीवल समितीच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. यावर्षी महाआरती आगळी वेगळी झाली. आरतीचा मान चेतक फेस्टीवल समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांना ट्रस्टने दिला होता. याप्रसंगी जि.प. सदस्या ऐश्वर्या रावल, किरण रावल, महिला समितीच्या सदस्या, शहादा उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, सहायक पोलीस निरीक्षक मनोहर पगार, दत्त मंदिर ट्रस्टचे सदस्य, चेतक फेस्टीवलचे सदस्यांसह भाविक उपस्थित होते.
प्रारंभी पूजा विधीनंतर आरती व प्रार्थना झाली. आरती प्रकाश जाधव पाटील (लोणखेडा), एकनाथ पाटील (म्हसावद), सकतसिंग गिरासे (टाकरखेडा) यांनी म्हटली. त्यानंतर बॅण्डपथक, भजनी मंडळीच्या उपस्थितीत गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. महानुभाव पंथीय अनुयायी महिलांनी गरबा, गोफनृत्य मुख्य बाजारपेठेत सादर केले.