नंदुरबार जिल्ह्यात अफवांचा बाजार आणतोय कायदा व सुव्यवस्था धोक्यात

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: June 29, 2018 01:16 PM2018-06-29T13:16:49+5:302018-06-29T13:17:19+5:30

Law and order in danger of bringing rumors in Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्यात अफवांचा बाजार आणतोय कायदा व सुव्यवस्था धोक्यात

नंदुरबार जिल्ह्यात अफवांचा बाजार आणतोय कायदा व सुव्यवस्था धोक्यात

Next

मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अफवांची मानसिकता नागरिकांच्या मनात कशी घर करून जाते याचे उदाहरण गेल्या दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. लहान मुले पकडणारे गावोगावी, शहराशहरात फिरत असल्याच्या अफवा आणि त्यातून समाजमनात निर्माण झालेली अस्थिरता याचे उदाहरण अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. नंदुरबारात देखील महिनाभरात किमान दहा जणांना अशा प्रकारे संशयावरून विनाकारण मार खावा लागल्याचे चित्र आहे. वास्तविक जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात लहान मुलांचे अपहरण होणे किंवा बेपत्ता होण्याचे जेही प्रकार गैरसमजातून घडले आहेत त्यातील मुलं सुखरूप परत आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची टोळी किंवा व्यक्ती जिल्ह्यात कार्यरत आहेत ही बाबच अनाकलनीय आहे. यासंदर्भात पोलिसांनी अशा अफवांबाबत उशीराने कडक कारवाईचे धोरण अवलंबले असल्याने अशा अफवांना पायबंद बसेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.   
अफवांचे मानसशास्त्र मोठे विचित्र असते. वारंवार एकच अफवा किंवा बातमी फैलवली, कानावर पडली तर त्याबाबत समाजमनात विश्वास निर्माण होऊन ते खरेच असल्याचे बिंबत असते. आता तर सोशल मिडियाची भर पडली आहे. उठसूठ कुणीही काहीही मेसेज तयार करतो आणि देतो सोशल मिडियावर टाकून. परिणामी तो व्हायरल होऊन तो खराच असल्याची चर्चा रंगते. त्याची सत्यता कुठेही पडताळली जात नाही. एकापेक्षा अधीक गृपवरून तो मेसेज आल्यावर तर सत्य असल्याचा त्यावर शिक्कामोर्तबच होतो. सध्या लहान मुलांच्या अपहरणाचे मेसेज देखील पोलिसांची आणि एकुण समाजमनाची मोठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. यामुळे अनेकांना मार खावा लागला तर काहींच्या जिवावरही बेतले आहे. एका शिक्षिकेलाही त्यातून जावे लागले. 
पोलीस दप्तरी नोंदी लक्षात घेतल्या तर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत बालकांचे अपहरण झाल्याच्या अवघ्या तीन ते चार नोंदी आहेत. त्या प्रकरणातील बालकं नंतर सुखरूप घरी पोहचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मुलांचे अपहरणाचे वृत्त निराधार ठरते. नंदुरबार शहरात गेल्या महिन्यात रेल्वे स्थानकावरून एका तीन वर्षाच्या बालकाला एक माथेफिरू घेवून जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. त्याची चौकशी करता तो परप्रांतीय असून मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी घटना सिंधी कॉलनीत घडली. घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालकाला एकाने सायकलवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. संबधीत व्यक्ती देखील चांगल्या घरातील असून मानसिक तणावाखालील होती. या दोन घटनांचा अन्वायर्थ सहज म्हणून घेतला गेला. परंतु अशा लोकांचा अपहरणाचा उद्देश राहत नसला तरी त्यांच्याकडून मुलांना काही अपाय झाला तर त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न कायम राहतो. प्रकाशा येथील दोन बहिणींच्या अपहरणाचे प्रकरणही चांगलेच गाजले. न्यायालयात शिक्षा भोगून आलेल्या एका वृद्धाने मुलींना सोबत नेले. त्या मुली सुरत येथे सुखरूप सापडल्या. सुदैवाने त्या सुरक्षीत राहिल्या. या प्रकरणात देखील मुली घेवून गेलेल्याचा उद्देश अपहरणाचा नसल्याचे स्पष्ट होते. परंतु आणखी काही दिवसात या मुली सुरत सारख्या शहरात एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या हातात पडल्या असत्या तर?  हा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे एखाद्या घटनांची अफवा पसरवतांना त्यातून पुढे काय वाढून ठेवलेले असेल याचाही विचार करणे आवश्यक असतो.
अफवा पसरविणा:या आणि सोशल मिडियावर चुकीचे मेसेज टाकणा:यांवर आता सायबर अॅक्टनुसार कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद बसेल यात शंका नाही. परंतु अशा बाबतीत पोलिसांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून दक्ष राहावे. अफवांच्या चर्चेत काहीवेळा समाजकंटक आपला उद्देशही साध्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘लांडगा आला रे आला..’ या म्हणीसारखी गत होऊ नये एवढेच.

Web Title: Law and order in danger of bringing rumors in Nandurbar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.