कायदा व सुव्यवस्थेसह दारू, गुटखा तस्करीचे एस. पीं.समोर आव्हान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:34 AM2021-09-23T04:34:00+5:302021-09-23T04:34:00+5:30

मनोज शेलार नंदुरबार : दंगलीचे शहर म्हणून राज्याच्या क्राईमच्या दप्तरी नोंद असलेल्या नंदुरबारची ओळख गेल्या काही वर्षात पुसली गेली ...

Law and order, liquor, gutkha smuggling s. P. Challenge! | कायदा व सुव्यवस्थेसह दारू, गुटखा तस्करीचे एस. पीं.समोर आव्हान!

कायदा व सुव्यवस्थेसह दारू, गुटखा तस्करीचे एस. पीं.समोर आव्हान!

Next

मनोज शेलार

नंदुरबार : दंगलीचे शहर म्हणून राज्याच्या क्राईमच्या दप्तरी नोंद असलेल्या नंदुरबारची ओळख गेल्या काही वर्षात पुसली गेली आहे. शहराची ही शांतता अबाधित ठेवण्याचे काम आता सर्वांच्या हाती आहेच, परंतु पोलीस दलाचे प्रमुख म्हणून नूतन पोलीस अधीक्षकांचीही तेवढीच जबाबदारी वाढणार आहे. गेल्या काही वर्षात क्राईम रेकॉर्ड कमी झाला आहे. त्याला विविध बाबी कारणीभूत असल्या तरी तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस प्रशासनावर ठेवलेली पकड त्याला कारणीभूत होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. नूतन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील हे अनुभवी अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळातदेखील पोलिसांची प्रतिमा आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतची स्थिती पहिल्यापेक्षा अधिक चांगली राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. नंदुरबार जिल्हा दोन राज्यांच्या सीमेवर वसला आहे. एक महामार्ग, तीन राज्यमार्ग, रेल्वेमार्ग जिल्ह्यातून गेला आहे. त्यामुळे पूर्वी जबरी लूटमार, दरोडा, चोरी, अवैध दारू वाहतूक यांचे प्रमाण मोठे होते. गुजरातला जाताना किंवा गुजरातमधून जिल्ह्यात येताना काही ठिकाणी तीन ते चार वेळा सीमा ओलांडावी लागते. अशीच स्थिती काही प्रमाणात मध्यप्रदेश राज्याचीदेखील आहे. त्यामुळे गुन्हेगारांना ते फावते आणि गुन्हा करून दुसऱ्या राज्यात जाण्यास त्यांना मोकळीक मिळते. परिणामी क्राईमचा आलेख नेहमीच वाढता होता. परंतु गेल्या काही वर्षात पोलिसांच्या कार्यपद्धतीत झालेली सुधारणा आणि इतर कारणे यामुळे क्राईमचा आलेख कमी झाला आहे.

नंदुरबार शहराची पाच वर्षांपूर्वीची स्थिती पाहता एका वर्षात दंगलीचे किमान दोन गुन्हे होत होते. राज्यात, देशात काहीही जातीय तणाव झाला तर त्याचा काहीही संबंध नसताना त्याचे पडसाद नंदुरबारात उमटत होते. त्यामुळे राज्याच्या क्राईम दप्तरी नंदुरबारची ओळख संवेदनशील म्हणूनच नोंदली जात होती. आता परिस्थिती बदलली आहे. गेल्या दोन वर्षात किरकोळ वादवगळता मोठ्या दंगलीचे गुन्हे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे नंदुरबारकरांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे. परंतु अवैध दारू वाहतूक, गुटखा तस्करी, वाहन चोरी या घटना मात्र पोलिसांना कायम आव्हान देणाऱ्या ठरल्या आहेत.

नूतन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पदभार स्वीकारला. पाटील यांच्या पोलीस दलातील अनुभवाचा फायदा जिल्ह्याला मिळेल यात शंका नाही. त्यांनी आतापर्यंत जेथे काम केले आहे तेथे त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे नंदुरबारचीही त्यांची कारकीर्द त्यांच्या अनुभवाला साजेशीच राहील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पोटनिवडणुका, त्यानंतर शहादा पालिकेची होणारी निवडणूक, पुढील वर्षी नंदुरबारसह तीन पालिकांची होणाऱ्या निवडणुकांमधील कायदा व सुव्यवस्था राखणे, ही मोठी जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. नंदुरबारात यापुढेही कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवायची असेल तर विस्कळीत झालेल्या मोहल्ला कमिट्या, शांतता कमिट्या यांची पुनर्रचना करावी लागणार आहे. शहरात सीसीटीव्हींचे जाळे पसरावे लागणार आहे. सद्यस्थितीत २९पैकी अवघे १२ कॅमेरे सुरू आहेत. अनेक संवेदनशील चौकात तर कॅमेरेच नाहीत. आंतरराज्यीय गुन्हेगारांवर वचक ठेवावा लागणार आहे. तळोदा, अक्कलकुवा, नवापूर तालुक्यात व्यापाऱ्यांना लुटण्याच्या घटना होत असतात. त्यावर बऱ्यापैकी प्रतिबंध बसला असला तरी अनेक गुन्हेगार पुन्हा डोके वर काढणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. वाहनचोरी ही मोठी डोकेदुखी आहे. आरोपी सापडूनही चोऱ्या कमी होत नाहीत, ही मोठी डोकेदुखी आहे. सध्या चोरट्यांनी शाळा, शासकीय कार्यालये यांना टार्गेट केले आहे. अशा चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या लागणार आहेत. आंतरराज्य अवैध दारू वाहतूक रोखावी लागणार आहे. मुख्य महामार्गांसह सातपुड्यातील नर्मदेतून होडीद्वारे होणाऱ्या या वाहतुकीचे रॅकेट खणून काढावे लागणार आहे.

एकूणच पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्यासमोर कितीही आव्हाने असली तरी ती ते लिलया पेलतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही.

Web Title: Law and order, liquor, gutkha smuggling s. P. Challenge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.