निवडणुकीसाठी पॅनलची आघाडी पण भाऊबंदकीत मात्र बिघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:26 AM2021-01-14T04:26:13+5:302021-01-14T04:26:13+5:30
तीन प्रभाग, सात सदस्य आणि ८०६ मतदारांचा समावेश असलेलं आटोपशीर गाव म्हणून कंढ्रे गावाची ओळख आहे. शेती हा प्रमुख ...
तीन प्रभाग, सात सदस्य आणि ८०६ मतदारांचा समावेश असलेलं आटोपशीर गाव म्हणून कंढ्रे गावाची ओळख आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या या गावात पाटील कुटुंबाच्या एखाद्या घरात एखादी व्यक्ती मृत झाल्यास अर्ध गाव सूतकात जातं. १९५६ साली येथील ग्रामपंचायतीची स्थापना करण्यात आली. २००५ पर्यंत याठिकाणी निवडणूक म्हणजे बिनविरोध असाच अनुभव होता. परंतु २००५ पासून प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम सुरु होऊन मतदान पार पडू लागलं. गावात राजकीय पक्षांना मानणारे दोन गट पडले तेही एकाच कुटुंबातले अन् याच कुटुंबांमधून ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय धुरळा उडू लागला आहे.
सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेत असलेलं प्रगती आणि विरोधात परिवर्तन अशा दोन पॅनलच्या चाैदा उमेदवारांमध्ये सरळ लढती आहेत. यात प्रभाग एकमध्ये संगीता लोटन पाटील ह्या परिवर्तन पॅनलच्या सदस्य आहेत तर त्यांच्याविरोधात सुमनबाई शिवाजी पाटील ह्या आहेत. संगीता ह्या पॅनलप्रमुख मुकेश विश्वास पाटील यांच्या काकू व माजी सरपंच आहेत.
दुसरीकडे प्रभाग दोनमध्ये अंकुश अवचीत पाटील व नागेश देविदास पाटील हे दोघे सख्खे चुलत भाऊ एकमेकांच्या विरोधात आहेत. याच प्रभागात सर्वसाधारण स्त्री गटातून पूनम रतीलाल पाटील व विद्या पंकज पाटील ह्या समोरासमोर आहेत. पूनम व विद्याचं नणंद भावजयीचं नातं आहे. विद्या ह्या माजी सरपंच सुनंदाबाई पाटील यांच्या स्नुषा आहेत. प्रभाग तीनमधील लढतीही रंजकच आहेत. माजी सरपंच बेबीबाई सुरेश पाटील ह्या पुष्पाबाई रमेश पाटील यांच्याविरोधात आहेत. या दोघींमध्ये जावांचं नातं आहे. तर याच प्रभागातील पंकज हरचंद पाटील व रामकृष्ण अशोक पाटील हे काका-पुतणे एकमेकांविरोधात आहेत.
या निवडणुकीत लढत देणारी पूनम ही अवघ्या २१ वर्षांची तर रामकृष्ण हा २३ वर्षांचा उमेदवार आहे. आपण आपल्याच नातलगांच्या विरोधात लढतो आहोत हे त्यांना ज्ञात आहे. परंतु ही लढत म्हणजे गावातील अस्तित्त्व असल्याचे सांगत ते निवडणूक रिंगणात आहेत. पाटील कुटुंबातील भाऊबंदकी रिंगणात असताना प्रभाग एकमध्ये आदिवासी संवर्गातून लढणाऱ्या मथुराबाई भिल ह्या माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण भिल यांच्या पत्नी तर त्यांच्या विरोधात त्यांचे जवळचे नातलग असलेल्या मनिषा भिल ह्या आहेत. दुसरीकडे माजी उपसरपंच नाना सोमा भिल यांच्या विरोधात त्यांचे आतेभाऊ शरद गुलाब भिल आहेत.
निवडणुकीमुळे पणास लागलेल्या या नातेसंबंधांचा येत्या १८ जानेवारी रोजी फैसला झाल्यानंतर काय असा प्रश्न येथील ग्रामस्थांच्या मनात वारंवार डोकावतो आहे.गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्न केले आहेत. पत्नी सरपंच असताना गावाचा विकास केला आहे. या विकासासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पाठपुरावा केला होता. यातून गावात काही विरोधक आम्ही केलेल्या कामांबाबत चुकीची माहिती देत असल्याने निवडणूक लढवत आहे.
-सुपडू पाटील,
प्रमुख, प्रगती पॅनल, कंढ्रे ता. नंदुरबार.
गेल्या पाच ते सात वर्षात सातत्याने जलसंधारणाची कामे केली आहेत. ग्रामपंचायतीत सत्तेत असणारे केवळ हुकूमशाही म्हणून राज्य करत आले. युवकांचा सहभाग होऊ दिला नाही. युवकांचा सहभाग वाढल्यास चांगल्या प्रकारे कामे होऊ शकतात. परंतु सत्ताधारी युवकांना दूर ठेवतात. म्हणून ही निवडणूक लढवली.
-मुकेश विश्वास पाटील,
प्रमुख प्रगती पॅनल, कंढ्रे ता. नंदुरबार.