राजरंग- निवडणुकीच्या धामधुमीतही नेते मात्र सुस्तच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 01:16 PM2020-12-27T13:16:24+5:302020-12-27T13:16:30+5:30

रमाकांत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्याचे राजकारण खरे तर ग्रामीण राजकारणावर अवलंबून असते, असे सांगितले जाते. ग्रामीण राजकारण ...

Leaders are sluggish even in the midst of elections! | राजरंग- निवडणुकीच्या धामधुमीतही नेते मात्र सुस्तच !

राजरंग- निवडणुकीच्या धामधुमीतही नेते मात्र सुस्तच !

Next

रमाकांत पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : जिल्ह्याचे राजकारण खरे तर ग्रामीण राजकारणावर अवलंबून असते, असे सांगितले जाते. ग्रामीण राजकारण जिकडे वळण घेते तिकडे जिल्ह्याचे राजकारणही फिरते; मात्र ग्रामपंचायतींच्या निवडणुका जेव्हा होतात तेव्हा मात्र गावातीलच गटातटात वादविवाद, चुरस रंगत असते. सध्यादेखील तेच चित्र ग्रामीण भागात पहायला मिळत आहे. जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्यात सध्या तरी स्थानिक ग्रामस्थांचीच धावपळ होताना दिसून येत आहे. नेते मंडळींचा हस्तक्षेप मात्र फारसा दिसून येत नाही.
ज्या ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत, त्यातील शहादा आणि नंदुरबार तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती आदिवासी क्षेत्राबाहेरील आहेत. अर्थात या गावांवर बिगर आदिवासी सरपंच बसणार असल्याने या गावांतील राजकारण अधिकच तापले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे त्यातील जवळपास बहुतांश गावे हे नंदुरबारचे विद्यमान आमदार व माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आले आहे. नंदुरबार विधानसभा मतदारसंघाला शहादा तालुक्यातील काही गावे जोडली आहेत. त्यातील ८० टक्के गावे ही नंदुरबार मतदारसंघातीलच आहेत. या गावांना भेटी दिल्या असता, ग्रामस्थांची अर्ज भरण्यासाठी धांदल सुरू असल्याचे दिसून येत आहे. नेत्यांच्या भेटी गावांना झालेल्या नाहीत. काही कार्यकर्ते नेत्यांकडे गेले; पण पाहू, बघू, करा... अशी उत्तरे मिळत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गावात वाद नको म्हणून काही कार्यकर्ते आपसांत समझोत्याचाही प्रयत्न करताना दिसून येत आहेत. या समझोत्यातून काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शहादा तालुक्यातील या गावांचे काम आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्यातर्फे जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व जि.प.चे विद्यमान कृषी सभापती अभिजित पाटील हे पाहत होते; मात्र नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राजकारण बदलले. अभिजित पाटील हे भाजपच्या विरोधात अर्थात काँग्रेसचे उमेदवार होते. त्यातून डॉ.विजयकुमार गावित व अभिजित पाटील यांच्यातही काहीसा दुरावा वाढला आहे. सध्या या गावांच्या निवडणुकांवर जयपाल रावल व अभिजित पाटील यांचेच लक्ष असून, हे दोन्ही गट यावेळी एकमेकांच्या विरोधात लढण्याची शक्यताही ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून वर्तवली जात आहे. नंदुरबार तालुक्यातील ज्या गावांच्या निवडणुका आहेत त्यात प्रामुख्याने डॉ.विजयकुमार गावित व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यकर्त्यांचे वर्चस्व आहे. या गावांमध्येदेखील राजकारणाची चुरस रंगत आहे.
तळोदा व शहादा तालुक्यातील ज्या गावांच्या निवडणुका आहेत तो भाग विद्यमान आमदार राजेश पाडवी यांच्या मतदारसंघात येतो. राजेश पाडवी मात्र गावागावापर्यंत पोहोचत आहेत. नव्हे तर त्यांनी बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतींना ११ लाखांचे बक्षीसही जाहीर केले आहे. नवापूर आणि धडगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत मात्र नेत्यांचा फारसा हस्तक्षेप नाही.
एकूणच या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील शेकोट्या राजकीय गप्पांनी तापत आहेत. येत्या तीन ते चार वर्षांपर्यंत लोकसभा, विधानसभा व जिल्हा परिषद यापैकी कुठल्याही निवडणुका नसल्याने जिल्हास्तरावरील नेते सध्या तरी निवांत आहेत. हे नेते लांबूनच गावातील हालहवाल व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे नेत्यांना सध्या तरी निवडणुकीच्या धामधुमीतही निवांतपणा मिळाला आहे.

Web Title: Leaders are sluggish even in the midst of elections!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.