नवापूर तालुक्यातील भामरमाळ येथे बिबट्याचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:42 PM2020-07-27T12:42:42+5:302020-07-27T12:42:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : तालुक्यातील भामरमाळ येथे शनिवारी रात्री वन्यप्राण्याने हल्ला करून एक शेळी फस्त केली तर इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : तालुक्यातील भामरमाळ येथे शनिवारी रात्री वन्यप्राण्याने हल्ला करून एक शेळी फस्त केली तर इतर सहा शेळ्या व बोकडाच्या मानेवर चावा घेत ठार केल्याची घटना घडली. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.
आहवा डांगच्या डोंगर श्रेणीत येणाऱ्या नागझिरीकडील जंगलाच्या भागात असलेल्या भामरमाळ गावात सुरेश जेठ्या वसावे या शेतकऱ्यांच्या रहात्या घराच्या बाजुलाच असलेल्या कच्च्या कुडाच्या गोठ्यात पाच शेळ्या व तीन बोकड ठेवलेले होते. पाच पैकी चार शेळ्या गाभण होत्या. २५ रोजी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या शेळ्या व बोकड यांना मानेवर चावा घेऊन ठार केले. त्यापैकी एका शेळीला ऊसाच्या शेतात घेऊन जाऊन फस्त केले. रात्री पाऊस सुरू असल्याने या घटनेची कुणालाच कुणकुणही लागली नाही. रविवारी सकाळी रायपुरचे सरपंच ईश्वर गावीत यांनी दुरध्वनी संदेशान्वये भामरमाळ येथील घटनेची माहिती वनविभागास दिली. याबाबतीत सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे व वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली उकाळापाणीचे वनरक्षक गायकवाड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पशुवैद्यकीय अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश ठाकूर, गावीत, रायपुरचे सरपंच ईश्वर गावीत, पोलीस पाटील आनंद पाडवी, वनपाल डी.के. जाधव व पंचांच्या उपस्थितीत घटनेचा पंचनामा करून जबाब नोंदविले. मृत शेळी व बोकडचे शवविच्छेदन प्रक्रियादेखील पूर्ण करण्यात आली. या शेतकºयाचे अंदाजीत ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. वनपाल डी.के. जाधव यांनी पंचनामा केला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक वनसंरक्षक रणदिवे व वनक्षेत्रपाल हाडपे यांनी भामरमाळ येथे रविवारी दुपारी भेट देवून माहिती घेतली. पाहणी दरम्यान, हल्ला करणारा प्राणी बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी शेतकºयाला मदत देण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले.