अज्ञेयाच्या भाळावर उजळल्या आभाळवाटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:10+5:302021-07-18T04:22:10+5:30

मी माझ्या दोन्ही मुलांसह कोरोनाशी मुकाबला करत होतो. धाकट्या मुलाला त्याचा स्पर्श झाला होता. मोठ्याला त्याहून अधिक त्रास होता. ...

Light shines on the spear of the agnostic! | अज्ञेयाच्या भाळावर उजळल्या आभाळवाटा!

अज्ञेयाच्या भाळावर उजळल्या आभाळवाटा!

Next

मी माझ्या दोन्ही मुलांसह कोरोनाशी मुकाबला करत होतो. धाकट्या मुलाला त्याचा स्पर्श झाला होता. मोठ्याला त्याहून अधिक त्रास होता. सर्वाधिक त्रास मला होता. आम्ही सारे शहादा येथेच आमचे थोरले बंदू मा. डॉ. शशांक कुलकर्णी यांच्या इस्पितळात दाखल झालो. दिनांक १८ एप्रिल ते ३० एप्रिल तिथे होतो. औषधांची मदत तर होतीच; पण या आजारात मुख्य आधार म्हणजे डॉ. सौ. अलकाताईंचा फोन, सर तुमचा आजचा आवाज कालच्यापेक्षा अधिक उन्नत.’ ताई म्हणायच्या आवाज ही माणसाची ओळख. ताईंनी मजकडून ‘ललित’चा नोव्हेंबर-डिसेंबर २०२० चा अंक वाचवून घेतला. या वाचनातून जगण्याच्या नाना परी उलगडत गेल्या. मानवी कल्पितापेक्षाही रमणीय व विविधांगी असे जग. या जगाचे ताईंनी दर्शन घडवले. कोरोना काळ त्यांच्यामुळे असा स्वाध्यायरत ठरला.

या काळात आपला नंदुरबार जिल्हा अंतर्बाह्य बदलला. आपले विवाह समारोह काय आणि शोक-सांत्वनेचे संदर्भ काय सारेच आमूलाग्र बदललेत. आपण या बदलाला स्वीकारत गेला. या लेखाच्या लेखनासमयीची स्थिती अशी आहे. राजकीय मेळावे, आंदोलने आणि नेते मंडळींच्या गाठीभेटी सुरूच राहिल्या. यात गर्दीचे व्यवधान कमी दिसले. आता तर पुनश्च निवडणुकांचे रंगणारे फड दिसताहेत. ‘जेवढी गर्दी अधिक तेवढी आपली लोकप्रियता मोठी,’ असा एक पोकळ भ्रम आपल्या नेतेमंडळींनी जोपासला. कसली मुखपट्टी? कुठले भौतिक अंतर? कुठली सार्वजिनक स्वच्छता? आणि कुठल्या नियमांचे पालन? अधिक गर्दी गोळा करणारा मोठा मानला गेला. गर्दीला ना चेहरा असतो ना ओळख. तरीही आपण गमावून बसलो. यात पुरुषांच्या तुलनेने महिलांचे प्रमाण कमी होते. लसीकरणात जिल्हा अव्वल ठरला. भुरट्या चोऱ्या-माऱ्यांसोबत गुन्हेगारी आणि परस्पर विद्वेषाच्या कथाही सार्वत्रिक आढळल्यात. आपल्याकडच्या आदिवासी युवकाने बॅटरीवर चालणारी तीन चाकांची अनोखी गाडी शोधून काढली. पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाने वेबिनार्ससह नाना शैक्षणिक उपक्रमांमधून आपण संपादित केलेला मान कायम राखला. धडगावच्या प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांची घोडदौड शाबासकीला पात्र ठरली. वेबिनार्सच्या माध्यमातून ज्ञानदान करण्याकामी तळोदा व अक्कलकुवा यांचाही सहभाग होता. तळोदा येथील श्री संत नामदेव महाराज ट्रस्टच्यावतीने संतश्रेष्ठ नामदेवराय यांच्या साडेसातशेव्या जयंतीचे औचित्य साधून विचार जागरणाचे काम मा. श्री. गोपाळरावभाऊ यांच्यामार्फत सुरू होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने वेबिनार्सच्या माध्यमातून आपले विचार, जागरणाचे कार्य अखंड ठेवले. अखिल भारतीय जैन संघटनेने सातशे मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. जिल्ह्यातील संस्था चालकांनी शाळा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. शहादा येथील जायंट्‌स व सहेली ग्रुपने कुकलट येथे श्रमदान केले. नंदुरबारच्या शिवाजी नाट्यमंदिराचा रंगमंच भरतनाट्यमच्या पदन्यासाने रोमांचित झाला. एस.टी.ची चाकं गरगरू लागलीत. एकीकडे वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीचे डिंडिम घोष कानावर येत होते; पण सातपुडा संपुटातून बांबूच्या झोळीवरून रुग्णांची वाहतूक सुरूच राहिली. आदर्श प्रतिष्ठानच्या छताखाली शहादा येथे कुपोषित बालकांच्या सेवाकार्याचे मिशन मा. डॉ. अलकाताई कुलकर्णी यांनी जारी राखले.

कोरोनाने आपल्याला एक पाठ शिकवला आहे. आता आपल्याला एक समंजस सूर आलापावा लागेल. समनुयोगाची शाळा सुरू ठेवावी लागेल. मानवी सहजीवनाचा आग्रह धरावा लागेल. खोट्या व निरर्थक स्पर्धा थांबवाव्या लागतील. लाभ व लोभावर विवेकाचे नियंत्रण राखावे लागेल. आपले आनंद, उल्हास, उत्सव साजरे करताना सातत्याने दुसऱ्याचा विचार करत राहावा लागेल. इतरांच्या हिताची काळजी घ्यावी लागले. ‘मी सुखी, तर जग सुखी’ असे न मानता ‘जग सुखी, तर मी सुखी’ अशी भावना जोपासावी लागेल.

माणूस कितीदा चढला, कितीदा पडला, कितीदा त्याने निराश होऊन उसासा टाकला, कितीदा सुस्तावला; तरीपण जोमाने वाटचाल करत राहिला. त्यांच्या क्षत-विक्षत पावलांनी पराजय कधी पत्करला नाही. तो सदोदीत काट्या-कुट्यातून वाट तुडवत राहिला. पराभवाची उपेक्षा केली. तो थकला-थबकला; पण थांबला नाही. त्याचे संकल्प अजेय राहिलेत. नव्या वाटा त्याला आकर्षित करत राहिल्यात. अंधार गर्भातल्या रात्रींच्या संदर्भांना त्याने दीपमाळेचे रहस्य समजावले. काळ्या कुळकुळीत आभाळाला चांदणमायेचे गोंदण अर्पिले. नकारात्मकतेला सकारात्मकेचा आत्मबोध शिकवला. मरणाच्या छातीवर पाय रोवून उभा ठाकला. अधिक प्रशस्त, अधिक प्रगल्भ, अधिक प्रखर निर्माण करण्याच्या यज्ञकार्यात सदैव संलग्न राहिला.

मी कोरोना अनुभवला. मला आयुष्यभर व्रतस्थपणा जोपासता आला. निर्वेर राहता आले. सद्‌विचारांचे संगोपन करता आले. पारदर्शी वाणी वापरता आली. या मी अनुभवलेल्या जीवनमूल्यांची एकूणच परीक्षा झाली. जे जपले-जोपासले ते योग्य होते, याची मनाला खात्री झाली. आनंदाने आनंद वाढतो, याचा साक्षात्कार झाला. इस्पितळातून बरा होऊन बाहेर पडत होतो. रॅम्पवरून चालत निघालो होतो. डॉ. दर्शननेे हे दृश्य बघितले. तो टाळ्या पिटत होता. आनंद व्यक्त करत होता. त्याच्या मुखावरची यशस्वी सांगता वाचता येत होती. तो आनंद वर्णनातीत होता. मी माझ्या घरच्या दिशेने निघालो होतो. अज्ञेयाच्या भाळावर आभाळवाटा उजळल्या होत्या.

Web Title: Light shines on the spear of the agnostic!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.