संडे स्पेशल मुलाखत-लग्न समारंभातील उपस्थितीवर मर्यादा ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 11:50 AM2020-11-22T11:50:55+5:302020-11-22T11:51:02+5:30
कोरोनामुळे सद्या लग्न समारंभ व इतर समारंभातील उपस्थितीवर मर्यादा आली आहे. लेवा गुजर समाजाने कोरोना नंतरही हे नियम पाळावेत. -दीपक पाटील.
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
पी.के.अण्णा पाटील यांनी अथक परिश्रमातून लेवापाटीदार गुजर समाजात शिस्त व नियम बांधून समाज परिवर्तनाची चळवळ उभारली आहे. तीच चळवळ पुढे नेण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. या समाजात अनेक आदर्श परंपरा असून, आजही इतर समाजातील लोक त्याचे अवलोकन करतात. सध्या कोरोनामुळे सामाजिक परंपरांवर बंधने आले आहे. काही गोष्टी त्यातूनही चांगल्या घडल्या आहेत. विशेषत: लग्नसमारंभ, मृत्यू नंतर दारावर जाणे, दशक्रिया विधी, घरभरणी कार्यक्रम, यातील गर्दींला मर्यादा आली आहे. त्यामुळे कोरोनानंतरही लेवापाटीदार गुजर समाजात विवाह व इतर समारंभातील गर्दीवर कायम मर्यादा राहावी यासाठी आपले प्रयत्न असल्याची माहिती समाजाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
समाज परिवर्तनासाठी कुठल्या नियमांची बांधणी केली आहे?
लेवापाटीदार गुजर समाजात हुंडा बंदी आहे. यासह लग्न व इतर विधी याबाबतही नियमांची चौकट तयार केली आहे. यासंदर्भातील विविध १९ नियमांचे पत्रक तयार करण्या आले असून, त्या चौकटीत समाजातील विधी परंपरा पार पडतात. त्याबाबत दरवर्षी वार्षीक अधिवेशन घेऊन चर्चा केली जाते. त्यात काही नवीन सूचना आल्यास त्यावरही चर्चा करून नियम केले जातात व ते नियम समाज पाळतो. म्हणूनच या अधिवेशनालाही महत्त्व असते. पी.के.अण्णा पाटील व समाजातील धुरींधरांनी वर्षानुवर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे. त्यामुळेच आज समाजात शिस्त आली आहे. आधुनिकता व बदलत्या पीढीनुसार काही जण नियम मोडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यावर वचक ठेवले जाते. आपण स्वत: लग्न समारंभात हजेरी लावून लोकांनाही नियम पाळण्याचे आवाहन करतो.
गुजर महासभेचे अध्यक्षपद
दीपक पाटील हे अखिल भारतीय लेवापाटीदार गुर्जर समाज व अखिल भारतीय गुजर महासभेचेही अध्यक्ष आहेत. लेवापाटीदार समाज हा नंदुरबार - धुळे जिल्ह्यासह गुजरात आणि मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात पसरला आहे. तर गुर्जर समाजाच्या विविध उपजाती असून, ताे देशभर आहे. त्याची संख्या देशात सुमारे ११ कोटीच्या घरात आहे. त्यामुळे या दोन्ही संघटनांचा समन्वया संदर्भात दीपक पाटील यांनी सांगितले की, लेवा गुजर समाज हा शिस्तप्रिय व या समाजातील प्रथा परंपरा वेगळ्या आहेत. याच परंपरा देश पातळीवरील गुर्जर समाजात रूजवाव्यात असे अनेकांचे मत आहे. त्यादृष्टीने वेगवेगळ्या भागातील समाजापर्यंत त्या पोहोचविण्यासाठी गुर्जर महासभेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे दीपक पाटील यांनी सांगितले.