क्रीडा क्षेत्रावरील लॉकडाऊन आता उठवायलाच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:13+5:302021-07-18T04:22:13+5:30

कोरोनाने गेले दीड वर्ष आपले सर्व व्यवहार अक्षरशः बंद पाडले. यामुळे अनेक अनिवार्य कामेही करणे कठीण होवून बसले. नित्याच्या ...

The lockdown on the sports sector must now be lifted | क्रीडा क्षेत्रावरील लॉकडाऊन आता उठवायलाच हवा

क्रीडा क्षेत्रावरील लॉकडाऊन आता उठवायलाच हवा

Next

कोरोनाने गेले दीड वर्ष आपले सर्व व्यवहार अक्षरशः बंद पाडले. यामुळे अनेक अनिवार्य कामेही करणे कठीण होवून बसले. नित्याच्या दैनंदिन जीवनातही काही गरजा पूर्ण करता-करता नाकेनऊ आले. टीव्हीवरचे मनोरंजन हेच जणू जीवन वाटू लागले. अगदी मॉर्निंग वॉकला जाणेही गेल्या काळात अवघड होवून बसले होते. कोरोनाच्या रहस्यमयी अस्तित्वाने काहीही केले तर कोरोना होणार असे समीकरण झाले होते.

दीड वर्षात अनेकांची शारीरिकपेक्षा मानसिक स्थितीच जास्त बिघडली. सर्वदूर हीच परिस्थिती असल्याने इतर वेळी दैनंदिन आयुष्यात ज्या स्पर्धांची, शिबिरांची आपण आतुरतेने वाट पहायचो त्या सुद्धा रद्द झाल्या. काही स्पर्धा घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु शासनाच्या निर्बंधामुळे त्या लागलीच रद्द कराव्या लागल्या. आता कुठे जनजीवन दीड वर्षानंतर हळूहळू सुरळीत होवू लागले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणातून वातावरण थोडेसे सकारात्मक झाले. दैनंदिन व्यवहार कुठे पूर्ण, कुठे अंशतः सुरू झाले. नोकरी, व्यवसाय रूळावर येवू लागले. उद्योग वाहतूक सुरू झाली. मॉल, थिएटर सुरू झाले. मैदानेही थोड्याफार प्रमाणात सुरू झाले. नेहमी प्रमाणेच खेळाडू मैदानावर येवू लागले. परंतु पुन्हा कोणत्या व्हेरिएंटमुळे प्रतिबंध लागतील याची धास्ती अजूनही खेळाडूंच्या मनामध्ये आहे. अशा या युद्धजन्य परिस्थितीवर मात करण्याकरीता खेळाडूंनी पुरेशी काळजी घेवून, लसीकरण करून आरोग्याची काळजी घेत खेळाची मैदाने संपूर्णपणे खुली करणे आजची अत्यावश्यक गरज बनली आहे.

जागतिक स्तरावर युरोपिय देशांमध्ये फुटबॉल स्पर्धा, ऑस्ट्रेलियन स्पर्धा, पीसीएल स्पर्धा, त्याचप्रमाणे आता सुरू होत असलेले ऑलम्पिक, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा, क्रिकेटचा वर्ल्डकप, आयपीएल आदींमुळे क्रीडा जगतावरील मरगळ हळूहळू झटकली जावू लागली आहे. प्रेक्षकांना प्रतिबंध करून स्पर्धा घेण्याकडे जागतिक स्तरावर सद्यातरी कल दिसतो. काही स्पर्धांना स्टेडीयमच्या मर्यादेच्या ५० टक्के क्षमतेनुसार प्रेक्षकांना हजेरी लावता येत आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या तथा राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या मनातून कोरोनाचे भय अजून निघालेले नाही. सामान्य परिस्थितीत खेळाशी तडजोड करणारा खेळाडू लढतो आहे. परंतु पुरेसी साधन सामुग्रीची त्याला गरज भासते आहे. खेळ आणि खेळाच्या स्पर्धा या काही फक्त खेळाडूंपुरताच मर्यादित नसतात. तर त्याला क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारे चाहते यांच्या आशा-आकांक्षा त्याला जोडलेल्या असतात. कोरोनामुळे नैराश्य पसरलेल्या या काळात क्रीडा क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. खेळाडूंमधील सकारात्मक बदल हा येणाऱ्या काळात होईलच. त्यामुळे मैदानांना सोनेरी दिवस येतील. आजच्या काळाची गरज पाहता आतातरी क्रीडा क्षेत्रावरील बंधन मुक्त करणे गरजेचे झाले आहे. स्पर्धांमधूनच खेळाडूंना आपली कामगिरी दाखविता येते. त्यातूनच सुधारणाही करता येते. वैयक्तिक खेळांना सुरूवात करण्यासाठी शासनाने परवानगी जरी दिली असली तरी खेळाडू म्हटले तर ते एकत्र येतच असतात. त्यासाठी १८ वर्षावरील खेळाडूंना ज्याप्रमाणे लस उपलब्ध आहे, त्याच प्रमाणात बाल खेळाडूंना लसीकरण होणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी दुर्गम जिल्हा आहे. शैक्षणिक स्तर ग्रामीण भागात कमी आहे. व यामुळे खेळाडूंना मार्गदर्शनाचा अभाव आहे. संधी जरी असली तरी योग्य माहिती खेळाडूंपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ती यंत्रणा शासन दरबारी कार्यान्वित झाली पाहीजे. त्याचबरोबर लहान मुलामुलींच्या लसीकरणाला वेळ असला तरी त्यांना आवश्यक टेस्ट घेवून मैदानांवर होणाऱ्या स्पर्धांसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. ज्यावेळेस स्पर्धा तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा मागच्या गतकाळाप्रमाणेच सुरू होतील. त्यावेळेस क्रीडा जगतात पुन्हा चैतन्य निर्माण होईल व जनजीवन सुरळीत झाल्याचे ते एक आदर्श बनेल. क्रीकेट, हॉकी, हॉलीबॉल, बॅटमिंटन, कबड्डी, खो-खो, टेनिक्वाईट, बुद्धीबळ, ऍथलेटिक्स या मैदानी खेळांच्या स्पर्धा सुरू हाेणे गरजेचे आहे. आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यकच आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या भितीने क्रीडा क्षेत्राचा गळा आवळणे योग्य नाही. ऑलम्पिक स्पर्धा जागतिक स्तरावर होत आहेत. त्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण जगभर खेळाविषयी सकारात्मक संदेश जाणार आहे. स्थानिक खेळांना परवानगी मिळाली तर ऑलम्पिक सारख्या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज होणारी नवीन पिढी ही मैदानावर आपले कौशल्य दाखवेल. यासारखी मैदाने सुरू करणे गरजेचे आहे.

खेळ पुढे गेला तर जीवन पुढे जाईल. खेळाडूंचे तथा पालकांचे मनोबल वाढेल. यासाठी मैदान गजबजने गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेतली पाहीजे. कोरोनाने फिटनेस आणि आरोग्य या दोन बाबी जीवनात महत्त्वपूर्ण असण्याची शिकवण दिली. त्यासाठीच लहान-मोठे सर्वांनी मैदानावर कसरत करणे गरजेचे आहे. स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण होणारी चुरस ही क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार आहे. यासाठी आपण सर्वांनी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करून खेळाडूंसाठी सकारात्मक विचार करुन आरोग्य संपन्न देशासाठी क्रीडा क्षेत्राकडे पाहणे गरजेचे आहे. - प्रा.डॉ.मयुर ठाकरे, क्रीडा शिक्षक, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार

Web Title: The lockdown on the sports sector must now be lifted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.