नंदुरबारसह चार शहरात ‘लॉकडाऊन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 09:27 PM2020-07-21T21:27:39+5:302020-07-21T21:34:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार शहरात आठ दिवस लॉकडाऊनची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या चार शहरात आठ दिवस लॉकडाऊनची घोषणा प्रशासनाने केली आहे़ २२ रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन सुरू होणार असून ३० जुलैपर्यंत हे लॉकडाऊन राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.
गुरूवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये दूध आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना सकाळी ७ ते ९ या दरम्यान व्यवसाय करण्यास मुभा राहणार आहे़ या काळात वैद्यकीय सेवा, औषध विक्रीची दुकाने पूर्वीप्रमाणे पूर्णवेळ सुरू राहतील. सर्व प्रकारची दुकाने, खाजगी आस्थापना बंद राहील. शासकीय कार्यालये या कालावधीत सुरु राहणार आहेत़ चारही शहरात केवळ वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना बाहेर पडण्यास मुभा राहणार आहे़ मात्र यासाठी रुग्णालयातील सबंधीत कागदपत्र सोबत ठेवावे असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे़
जिल्हाधिकारी डॉ़ भारूड यांनी काढलेल्या आदेशानुसार शहरांमधील सरकारी कार्यालये मर्यादित उपस्थितीत सुरू राहतील तथापि अभ्यागतांना कार्यालयास भेट देण्यास परवानगी नसेल. स्वस्त धान्य दुकानदारांनी या काळात धान्य वाटप न झालेल्या लाभार्थींना धान्य वाटप करावे, पेट्रोलपंपावर कोरोना विषयी कामकाज करणाºया ओळखपत्रधारक शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच तसेच शासकीय वाहनांनाच पेट्रोल किंवा डिझेल देण्यात यावे. या व्यतिरिक्त अन्य वाहनांना पेट्रोल किंवा डिझेल देऊ नये असे निर्धारित करण्यात आले आहे़
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी तसेच विषाणूची संपर्क साखळी खंडीत करणे आवश्यक आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत संचारबंदीचे पालन करावे. या काळात अनावश्यकपणे बाहेर फिरणाºयांवर कडक कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आधीच करावी. वस्तू खरेदी करताना गर्दी करू नये व संचारबंदीचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारूड यांनी कळवले आहे़
दरम्यान लॉकडाऊन होणार असल्याची माहिती असल्याने अनेक जणांनी सायंकाळपासून शहरी भागातील पेट्रोल पंपांवर गर्दी केली होती़ बुधवारी दिवसभर व्यवहार सुरू राहणार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे़
या कालावधीत अक्कलकुवा व धडगाव शहरातील सर्व आस्थापना व दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहणार आहे़ ३० जुलैपर्यंत वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त आंतरजिल्हा प्रवासास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. दुकाने आणि आस्थापनांनी २२ जुलै रोजी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार करावा असे आदेशही देण्यात आले आहेत़