लॉकडाऊनमध्ये वीज कंपनीकडून केवळ मान्सूनपूर्व दुरुस्तीच होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:21 PM2020-04-16T12:21:50+5:302020-04-16T12:21:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात विविध विभाग कमीतकमी कर्मचारी बोलावून यांत्रिकी दुरुस्त्या करुन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात विविध विभाग कमीतकमी कर्मचारी बोलावून यांत्रिकी दुरुस्त्या करुन घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत़ या वीज वितरण कंपनीने केवळ मान्सून पूर्वी होणाऱ्या दुरुस्तीच्या कामांनाच प्राधान्य दिले असून लॉकडाऊनमध्ये वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कंपनीचे अधिकारी प्रयत्नशील आहेत़
जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन भागात एकूण ३०२ फिडर आहेत़ या फिडरवरुन जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार अशा दोन विभागात १२० मेगाव्हॅट वीज दर दिवशी नियमित देण्यात येते़ सध्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे, मोठ्या कंपन्या आणि किरकोळ दुकाने बंद असल्याने वीजेचा तुटवडा कमी झाला आहे़ यातून जिल्ह्यातील सर्वच भागात २४ तास अखंड वीज पुरवठा सुरु आहे़
कंपनीकडून लॉकडाऊन काळात दुरुस्तीची कामे करण्यात येण्याची शक्यता होती़ परंतू जास्त कर्मचारी एकमेकांच्या संपर्कात येण्याची शक्यता असल्याने दुरुस्तीची कामे थांबवण्यात आली आहे़ तरीही दुसरीकडे शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वीची दुरुस्तीची सर्व कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे़ नवापुर तालुक्यातून याची सुरुवात करण्यात आली असून झाडांची छाटणी, तारांची दुरुस्ती, वाकलेले खांब सरळ करणे तसेच ट्रान्सफार्मर्सचा आढावा घेण्याचे कामकाज होत आहे़
याबाबत अधिक्षक अभियंता आऱएम़ चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की, शहरी आणि ग्रामीण भागात वेळोवेळी दुरुस्तीची कामे होतील़ मोठी दुरुस्ती लॉकडाऊननंतर करण्यात येतील़ जिल्हा रुग्णालय तसेच निर्माण करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्ड आणि क्वारंटाईन कक्षांमध्ये नियमित २४ तास वीज पुरवठा करण्यात येणार आहे़ तेथील वीज बंदच होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे़ पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्त्यांसाठी कमीत कमी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले आहे़
दरम्यान जिल्ह्यात ७० छोटे-मोठे उद्योग आहेत़ यातील तीन साखर कारखाने आधीच बंद झाले होते़ उर्वरित मोठ्या उद्योगही बंद असल्याने औद्योगिक क्षेत्रासाठी देण्यात येणारी वीज पूर्णपणे वाचली असल्याची माहिती देण्यात आली आहे़