लोकसभा व विधानसभा स्वबळावरच लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:00 PM2018-09-28T12:00:31+5:302018-09-28T12:00:39+5:30
सेनानेते संजय राऊत : प्रचाराची सुरुवात नंदुरबारातून करण्याचा मानस
नंदुरबार : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलतांना केला. आगामी प्रचाराची सुरुवात देखील नंदुरबारातूनच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार व अक्कलकुवा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.
कार्यकर्ता मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत गुरुवारी नंदुरबारात आले होते. सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. ते म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्थानिक पातळीवर लढल्या जातील. निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनेच आपण राज्यभर दौरे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात नंदुरबारातूनच प्रचाराची सुरुवात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी नंदुरबार किंवा अक्कलकुवा येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर मेळावा घेण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. काँग्रेसला नंदुरबार लकी होते. निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात, योजनांची सुरुवात ते येथूनच करीत होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी देखील नंदुरबारला पसंती देत शिवसेनेसाठी देखील नंदुरबार लकी राहील असा आशावाद व्यक्त केला आहे. आतार्पयत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीने आदिवासींना गृहीत धरूनच राजकारण केले आहे. परंतु आता दुसरी पिढी ही शिवसेनेकडे वळत आहे. त्यांनाही त्यांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी युती करण्याबाबतचे सुतोवाच केल्याचे विचारले असता ते त्यांनाच माहिती. 2014 मध्ये का सुचले नाही. युती तोडण्याचा पुढाकार त्यांचाच होता. आता शिवसेना 2014 प्रमाणेच स्वबळावर आणि लोकसभा व विधानसभेच्या संपुर्ण जागांवर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आयोध्येचा प्रश्न न्यायालयात सुटणारा नाही. केंद्र शासनाने अध्यादेश काढून हा प्रश्न सोडवावा अशी आमची मागणी आहे. आता प्रत्येक बाबतीत न्यायालयांमध्ये जाण्याचा प्रघातच पडला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही.
शासनानेच काय ते ठरवून राममंदीराचा प्रश्न सोडावा असेही खासदार राऊत यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी केलेले विधान हे स्थानिक परिस्थितीला धरून योग्यच होते असेही त्यांनी स्पष्ट करीत पाडवी यांची पाठराखन केली. यावेळी सेना नेते संजय उकिरडे, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.