नंदुरबारात डोंगर उतारावरील घरांच्या सव्रेक्षणला खो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 12:33 PM2018-06-23T12:33:18+5:302018-06-23T12:33:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आपत्ती व्यवस्थापनाला यंदा जिल्हा प्रशासनासह राज्य सरकारनेही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. परंतु नंदुरबारातील नाले काठावरील आणि डोंगर उतारावरील वस्तीबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अशा वस्तीमधील कुटूंबांना सुचना देणे आवश्यक आहे. दरम्यान, पालिकेने नालेसफाई केली असून दरडी कोसळू शकणा:या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात नाले, गटारी तुंबून त्यांचा प्रवाह बदलतो. परिणामी शेजारी राहणा:या कुटूंबांना, घरांना त्याचा त्रास सहन करून नुकसान सोसावे लागते. ही बाब लक्षात जिल्हाधिका:यांनी सर्व पालिकांना विशेष सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार पावसाळ्यापूर्वी आपत्तीची शक्यता असलेली सर्व कामे तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यानुसार नंदुरबार पालिकेने कामांना देखील सुरुवात केली आहे. नालेसफाई, गाळ काढणे, डोंगर उतारावरील घरांना तसेच पडक्या इमारती असलेल्यांना धोक्याचा सुचना देवून त्यांना ते खाली करण्यासंदर्भात नोटीसा दिल्या जात आहेत.
नाले सफाई पुर्ण
नगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी शहरातील शहजादा नाला, मेहतर वस्ती, शास्त्रीमार्केट, द्वारकाधिश मंदिर, हाटदरवाजा, गोंधळी गल्ली, माळीवाडा, तसेच धुळे-साक्री वळण रस्त्यावरील गवळी समाज स्मशानभूमीजवळील नाला, रावण दहन मैदान परिसर, पाताळगंगा नदी, साक्रीनाका, दंडपाणेश्वर मंदिर, रेल्वे पटय़ापलिकडील पटेलवाडी, रेल्वेकॉलनी परिसर, मदन मोहन नगर, कोरीट नका, गिरीविहार कॉलनी, जिजामाता महाविद्यालय परिसरातील नाले, गटारी, स्वच्छ करून गाळ उपासण्यात आला आहे. यासाठी स्वतंत्र जेसीबी लावण्यात आली होते.
उतारावरील वस्ती
शहरातून गेलेल्या टेकडीच्या रांगेच्या दोन्ही बाजूस असलेल्या वस्तीला पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर धोका निर्माण होतो. डोंगर खचणे, दरडी खचून त्या खाली कोसळणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे काहीवेळा अपघात होऊन जिवीत व वित्त हाणी होत असते. ही बाब लक्षात घेता पालिकेने डोंगर उतारावरील घर मालकांना देखील सुचीत केले आहे.
पालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, संजयनगर, नवनाथनगर, साक्रीनाका, धुळे टेकडी, वाघेश्वरी टेकडी, गणेश टेकडी येथे राहणा:या नागरिकांनी पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे जमीन खचण्याची शक्यता असते. तसेच डोंगर उतारावरील जमीन खचण्याची शक्यता असते. त्यामुळे जीवीत तसेच मालमत्तेची हाणी होण्याची संभावना नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांनी स्थलांतर करावे, जेणेकरून होणारी जीवीत व मालमत्तेची हानी टाळता येईल. जे नागरिक स्थलांतर करणार नाही, त्यांच्या जिविताला अथवा मालमत्तेची हानी झाल्याची त्याची जबाबदारी पालिकेची राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
नंदुरबारात डोंगर उतारावर मोठय़ा संख्येने वस्ती तयार झाली आहे. यातील बरेचशे अतिक्रमण आहे. परंतु वर्षानुवर्षापासून संबधीत कुटूंब त्या ठिकाणी राहत असल्यामुळे पालिकेने अशा ठिकाणी नागरि सुविधा उपलब्ध करून देत ते अतिक्रमण कायम केले आहे. अशा डोंगर उतारावरील वस्तींमध्ये पावसाळ्यात दरड कोसळणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी समस्या मोठय़ा प्रमाणावर निर्माण होत असतात.
याशिवाय वाघेश्वरी टेकडीच्या दोन्ही बाजुंनी देखील मोठय़ा प्रमाणावर रहिवास वस्ती वाढली आहे. या टेकडीवरील मोठमोठय़ा शिळा जिवघेण्या ठरू शकतात. त्यामुळे त्यांच्याबाबतही आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे ठरणार आहे. या टेकडीवर अवैधरित्या मुरूम उत्खनन देखील मोठय़ा प्रमाणावर झाल्याने धोका आणखीच वाढला आहे.
नदीला नाल्याचे स्वरूप
शहरातून वाहणा:या पाताळगंगा नदीला आता नाल्याचे स्वरूप आले आहे. नदी पात्रात अनेक ठिकाणी काटेरी झुडपे वाढली आहेत.
पालिकेने तसेच नागरिकांनी गटारींचे पाणी थेट नदीपात्रात सोडले आहे. त्यामुळे नदीचा प्रवाह अगदी नाल्याच्या स्वरूपात झाला आहे. अतिवृष्टी झाल्यास नदीला पाणी येते, परिणामी पाण्याचा प्रवाह बदलून मिळेल त्या दिशेने ते वाहत जाते. त्यामुळे नदीपात्र मोकळे करावे, नदीपात्रात ज्यांनी अतिक्रमणे केली आहेत त्यांची अतिक्रमणे हटवावी अशी मागणी नदी किणा:यावर राहणा:या नागरिकांनी केली आहे.
दोन वर्षापूर्वी लोक सहभागातून प्रवासी संघटनेने पाताळगंगा स्वच्छतेची मोहिम सुरू केली होती. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. परंतु त्यात सातत्य न राहिल्याने पुन्हा जैसे थे परिस्थिती झाली आहे.