बोरद शिवारात पपई पिकाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:26 AM2021-01-15T04:26:42+5:302021-01-15T04:26:42+5:30
बोरद येथील शेतकरी योगेश मधुकर पाटील यांचे बोरद शिवारात शेत आहे. त्यांनी शेतात पपईची लागवड केली आहे. १३ जानेवारी ...
बोरद येथील शेतकरी योगेश मधुकर पाटील यांचे बोरद शिवारात शेत आहे. त्यांनी शेतात पपईची लागवड केली आहे. १३ जानेवारी रात्री ते १४ जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास अज्ञात माथेफिरुने २५० ते ३०० झाडांवरील कच्ची पपई तोडून फेकली तर काही झाडांची कत्तल केल्याची घटना घडली. त्यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. योगेश पाटील यांनी या घटनेबाबत बोरद पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दिली असून हवालदार विजय ठाकरे, लक्ष्मण कोळी, एकनाथ ठाकरे यांनी शेतात भेट देऊन पंचनामा केला. याबाबत योगेश पाटील यांनी जिल्हाधिकारी, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनाही निवेदन पाठविल्याचे सांगितले.
बोरद व मोड परिसरात पपई, केळीपिकाचे नुकसान व झाडांची कत्तल करणे, ऊस जाळणे, कापूस चोरणे, शेती साहित्याची चोरी व नुकसान करणे आदी घटना नित्याच्याच झाल्या आहेत. या घटनांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. पिकांच्या संरक्षणासाठी पोलीस दलाने स्वतंत्र पथक नेमण्याची गरज आहे तसेच अशा माथेफिरुंचा पोलिसांनी शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.