रंगावलीच्या पुराने औद्योगिक प्रकल्पांचेही नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 01:46 PM2018-08-19T13:46:57+5:302018-08-19T13:47:02+5:30
डाळ व यंत्रांचे नुकसान : 11 फुट संरक्षण भिंत तोडून पाणी शिरले; 75 लाखांची हाणी
नवापूर : 1976 साली आलेल्या महापुराची पुनरावृत्ती होवून येथील स्वस्तिक डाळ मिलमध्ये सुमारे 75 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नदीकिनारी 11 फुट उंच संरक्षक भिंत तोडून पुराचे पाणी घुसल्याने यंत्र व डाळीचे नुकसान झाले.
16 ऑगस्टच्या पहाटे रंगावली नदीच्या महापुरात नदीकिनारी असलेली स्वस्तीक डाळ मिल भक्ष्य ठरली. नदी पात्रापासून 20 मीटर लांब असलेल्या या डाळ मिलच्या सर्व बाजुंनी सिमेंट काँक्रिट युक्त 11 फुट उंचीची संरक्षक भिंत उभारण्यात आली आहे. पुराचे पाणी या भिंतीच्या चार फुट वरून वाहून निघाल्याने संरक्षक भिंतीचा 400 फुट लांबीचा भाग पडून गेला. पुराच्या पाण्यास मोठी जागा उपलब्ध झाल्याने मिलच्या आतील सुमारे दोन एकर परिसरात हे पाणी घुसले. डाळ सुकविण्यासाठी असलेली प्रशस्त जागा व्यापल्यानंतर डाळीवर प्रक्रिया करून साठवणूक होत असलेल्या इमारतीत पुराचे पाणी शिरले. याठिकाणी चार फुटार्पयत पाणी घुसल्याने प्रक्रिया करून साठवलेली डाळ पाण्याखाली आली. सुमारे 45 लाख रुपये किमतीची ही डाळ पुराच्या पाण्यात खराब झाली. शिवाय यंत्र सामुग्री व संरक्षक भिंत, विद्युत खांब, संलगA सामान मिळून सुमारे 75 लाख रूपये किमतीचे नुकसान झाले आहे. मिलच्या आतील भागात गाळ पसरला असून, ट्रॅक्टरद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू असून, पाण्याखाली गेलेल्या डाळीची दरुगधी येत असल्याने त्याची विल्हेवाट लावली जात आहे. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका या डाळ मिलला बसला आहे.
6 जून 1976 रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास रंगावली नदीला याहून अधिक भयावह महापूर आला होता. त्यात स्वस्तिक डाळ मिलमध्ये पुराचे पाणी शिरल्याने त्याकाळी दहा लाख रुपयानचे नुकसान झाले होते. आजच्या भावानुसार ही रक्कम नऊ कोटीच्या घरात आहे. जूनची सुरूवात असल्याने प्रक्रिया केलेल्या डाळीचा मोठा स्टॉक पाण्याखाली गेल्याने नुकसान वाढले होते. 13 ट्रक भरून खराब झालेली डाळ फेकण्याची वेळ या उद्योग समुहावर आली होती. 1976 साली आलेल्या महापुराचे पाणी रेल्वे स्थानका पावेतो जावून पोहोचले होते. दोन्ही महापुरात स्वस्तिक डाळ समूह भक्ष्य ठरले हा योगा योग आहे.