बँकेच्या रांगेत ‘सोशल डिस्टन्सिंग’ हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 12:32 PM2020-10-01T12:32:01+5:302020-10-01T12:32:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील मोलगी येथे बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेबाहेर बँक सुरू असण्याच्या वेळेत पैसे काढण्यासाठी नागरिकांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील मोलगी येथे बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेबाहेर बँक सुरू असण्याच्या वेळेत पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे़ या गर्दीत सोशल डिस्टन्सिंग हरवली असून यावर नियंत्रण येणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहेत़ याप्रकारामुळे दुर्गम भागातील जनजागृतीचा प्रश्न पुन्हा समोर येत आहे़
सातपुड्याच्या अती दुर्गम भागातील ग्रामस्थांसाठी मोलगी हे एकमेव मध्यवर्ती ठिकाण आहे़ यामुळे येथील बँकेत मोठ्या संख्येने ग्राहकांची खाती आहे़ ३० किलोमीटरचा परिघ असलेल्या बँकेच्या कार्यक्षेत्रात गाव आणि पाड्यांचा समावेश आहे़ या बँकेच्या शाखेत दर दिवशी पैसे काढणे, जमा करणे या कामांशिवाय आधार नोंदणीसाठी शेकडो ग्राहक येतात़ येथे वीज किंवा नेट सुरू नसल्यास मग या ग्राहकांना बँकेबाहेर थांबण्याची वेळ येते़ परिणामी बँकेपासून २०० मीटरच्या अंतरातील सर्व रस्ते आणि दुकानांचे ओटे हाऊसफुल्ल होतात़ इतरवेळी हे सर्व योग्य असले तरी सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे ही बाब गंभीर आहे़ आजघडीस तोंडाला लावला जाणारा मास्क हीच सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचे शासन सांगत आहे़ यामुळे याठिकाणी जिल्हा प्रशासनाने काहीतरी बंदोबस्त करुन गोरगरीब आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे़
मोलगी येथे बँक आणि आधार सेंटर हे प्रत्येकी एकच आहे़ या दोन्ही ठिकाणी ३० किलोमीटर अंतरातून आदिवासी बांधव येतात़ वीज आणि इंटरनेट कनेक्शन नसल्यास ते एकाच जागी एकत्र येत आहेत़ यामुळे बँक आणि आधार केंद्रात नियमित विज पुरवठा आणि कनेक्टीव्हीटी दिल्यास या दोन्ही ठिकाणी होणारी गर्दी कमी होणार आहे़ याबाबत गेल्या अनेक वर्षात कोणत्याही प्रकारचे कामकाज झालेले नाही़ गावात वीज खंडीत झाल्यास संपूर्ण दिवसात तो पूर्ववत होत नसल्याचे चित्र आहे़