गोदीपूर येथे प्रेमीयुगलाचा गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 01:00 PM2021-01-03T13:00:16+5:302021-01-03T13:00:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपुर शिवारातील शेतात प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणपुरी : शहादा तालुक्यातील गोदीपुर शिवारातील शेतात प्रेमी युगलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गुरूवारपासून हे प्रेमीयुगल शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथून बेपत्ता होते. आज दोघांचे मृतदेह शेतात आढळून आले.
शहादा तालुक्यातील गोदीपुर शिवारातील संजय नरोत्तम पाटील यांच्या केळीच्या शेताच्या बांधावर निंबाच्या झाडाला साडीच्या साहाय्याने युवक व युवतीने गळफास घेतलेली दिसून आले. घटनेची माहिती संबंधित शेतमालकाला मिळताच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती गोदीपुर येथील पोलीस पाटील प्रविण पाडवी यांना दिली. त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. घटनास्थळी शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एम.रमेश, पोलीस उपनिरीक्षक एम.डी. नाईक, हवालदार मेहरसिंग वळवी, ब्राह्मणपुरी बिटाचे धिरसिंग वळवी, अजय गांगुर्डे, लोमटे, अनिल पावरा दाखल झाले. गळफास घेतलेल्या युवकाचा खिश्यात मोबाईल तसेच जवळ मोटार सायकल क्रमांक (एम.एच.१८ बी.एफ.६५६९) उभी आढळून आल्याने पोलीसांनी तपास चक्रे फिरवत संबंधित युवक व महिला कुठली याचा तपास केला असता शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील लक्ष्मी अशोक मोरे (३०) वर्षीय विवाहित महिला तसेच सागर दयाराम फुले रा.वाडी खु. ता.शिरपूर (२५ ) हे दोघेही बेपत्ता असल्याचे कळले. या तरुणाविरुद्ध शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुरुवार पासून दोघेही फरार झाले होते. त्यामुळे महिलेच्या पतीने शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये अपहरण झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर शहादा तालुक्यातील गोदिपूर शिवारात या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांचे मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.
शिरपूर तालुक्यातुन गोदिपूर येथे आले कसे...?
प्रेमयुगल हे शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील असून हे शहादा तालुक्यातील नवेगोदीपुर येथे नातेवाईकांकडे आले असल्याची माहिती मिळाली परंतु नातेवाईक हे परराज्यात पोटाची खळगी भरण्यासाठी गेले असल्याने हे प्रेमीयुगलाने गोदीपुर शिवारातील शेतात येऊन गळफास घेतल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.