तो परत आला... नंदूरबार जिल्ह्यातील गुरांमध्ये पुन्हा लम्पी त्वचारोगाचा शिरकाव
By रमाकांत.फकीरा.पाटील | Published: August 22, 2023 05:40 PM2023-08-22T17:40:10+5:302023-08-22T17:40:48+5:30
जिल्ह्यात गेल्यावर्षी पाळीव गुरांमध्ये लम्पी त्वचा रोगाने धुमाकूळ घातला होता
रमाकांत पाटील/नंदुरबार
नंदुरबार : जिल्ह्यातील काही ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी स्कीन या साथरोग सदृश लक्षणे आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला असून गुरांच्या लसीकरणासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान लम्पी रोग झालेल्या पशूचे दूध मानवी आहारात हानीकारक नसल्याचा निर्वाळा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी पाळीव गुरांमध्ये लम्पी त्वचा रोगाने धुमाकूळ घातला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जिल्ह्यात ९७ हजार ५९ गायी, १ लाख ८ हजार ३४६ बैल, १९ हजार ७ वासरू अशा एकूण २ लाख २४ हजार ४१२ गुरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले होते. यंदाही जिल्ह्यात काही भागात लम्पी त्वचारोग सदृश लक्षणे असलेल्या गुरांची संख्या वाढत आहे. यातून उपाययोजना व्हाव्यात यासाठी पहिल्या टप्यात १ लाख ५२ हजार १०० तर दुसऱ्या टप्प्यात १ लाख ५२ हजार २०० अशा एकूण ३ लाख ४ हजार ३०० लस मात्रा पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध करून दिल्या असून त्यानुसार लसीकरण सत्र सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान येत्या काळात लम्पी बाधित जनावरांच्या संख्येत वाढ झाल्यास प्रादुर्भावग्रस्त भागातील १० किलोमीटरच्या परिघातील बाजार, यात्रा आणि पशू प्रदर्शनांवर बंदी आणण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. यू. डी. पाटील यांनी दिली.