Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 10:57 AM2024-11-05T10:57:42+5:302024-11-05T10:58:48+5:30

Maharashtra Assembly election 2024: नंदुरबार जिल्ह्यात महायुतीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीपासूनचं गावित आणि शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. त्याच आता कडेलोट झाला. 

Maharashtra Election 2024 Eknath Shinde's Shiv Sena in trouble due to bjp leader Heena Gavits in akkalkuwa vidhan sabha election 2024 | Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण

Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण

रमाकांत पाटील, नंदुरबार 
Maharashtra Election 2024: भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार तथा राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. हीना गावित यांनी अखेर अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकावलेच! त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला अर्ज माघार न घेतल्याने भविष्यात जिल्ह्यातील राजकारणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार तथा पक्षाचे धुळे-नंदुरबार संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचे आणि गावित परिवारातील वाद सर्वश्रुत आहे. हा वाद लोकसभा निवडणुकीत कायम राहिला. तोच वाद विधानसभा निवडणुकीतही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत डॉ. हीना गावित पुन्हा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. मात्र, भाजपने आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना नंदुरबारमधून पुन्हा उमेदवारी जाहीर केल्यानंतर डॉ. हीना गावित निवडणूक लढवणार नाहीत, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. परंतु, त्यांनी अक्कलकुवा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. 

विशेष म्हणजे हा मतदारसंघ महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला सुटला आहे. या पक्षाने विद्यमान विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतरही डॉ. गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघ शिंदेसेना भाजपसाठी सोडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. नव्हे तर त्यादृष्टीने प्रयत्नही केले होते.

मात्र, पक्षीय पातळीवर तसे झाले नाही. त्यामुळे एबी फॉर्मअभावी त्यांचा भाजपकडून भरलेला अर्ज बाद झाला. मात्र, अपक्ष अर्ज कायम होता. हा अर्ज त्या मागे घेतील, असे बोलले जात होते. कारण शिंदेंच्या शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार आमदार आमश्या पाडवी यांच्याशी गावित परिवाराचे संबंध चांगले आहेत, पण तसे घडले नाही.

बंडखोरीसाठी काय ठरले कारण?

डॉ. हीना गावित यांचा गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात उघडपणे प्रचार केला होता. त्या निवडणुकीतच महायुतीतील गटबाजी समोर आली होती. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा त्यावेळीही प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची मध्यस्थी अयशस्वी ठरली होती.

माघारीसाठी नेमकी काय होती अट? 

डॉ. हीना गावित यांनीच शिंदेंच्या शिवसेनेवर नंदुरबारला या पक्षातर्फे काँग्रेस उमेदवाराला समर्थन दिले जात असल्याचा आरोप करीत नंदुरबारला जर शिंदेंच्या शिवसेनेने भाजपविरुद्ध काँग्रेसचा जो उमेदवार दिला आहे, त्यांनी माघार घेतली तरच आपण अर्ज मागे घेऊ, अशी जाहीर भूमिका मांडली आणि आपला अक्कलकुव्यातील उमेदवारी अर्ज कायम ठेवला.

या सगळ्याबद्दल बोलताना हीना गावित म्हणाल्या, "महायुतीतील शिस्त म्हणून मी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी भाजपला उघड विरोध करीत आहेत. पक्षश्रेष्ठींना कळवूनही परिणाम होत नसल्याने आपण उमेदवारी केली आहे", अशी भूमिका गावित यांनी मांडली. हीना गावित यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. 

Web Title: Maharashtra Election 2024 Eknath Shinde's Shiv Sena in trouble due to bjp leader Heena Gavits in akkalkuwa vidhan sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.