टंचाईबाबत वस्तुनिष्ठ नियोजन करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:46 PM2018-10-17T12:46:42+5:302018-10-17T12:46:47+5:30
नवापुरात बैठक : सुरुपसिंग नाईक यांच्या सूचना, विविध विभगांचा आढावा
नवापूर : आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार नाही यासाठी संबंधित यंत्रणेने वस्तुनिष्ठ नियोजन करून दक्षता घ्याव्यात, अशा सूचना आमदार सुरूपसिंग नाईक यांनी दिल्या. तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिका:यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, बाजार समितीचे सभापती मधुकर नाईक, तहसीलदार सुनीता ज:हाड, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, सहायक गटविकास अधिकारी बी.डी. गोसावी, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रथमेश हाडपे, तालुका कृषी अधिकारी व्ही.डी. चौधरी, पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय पाडवी, जेरा वळवी, सहायक निबंधक प्रताप पाडवी, लघुसिंचन, पाटबंधारे व पंचायत समिती बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
तालुक्यात विद्युत पुरवठय़ाच्या अनियमिततेचा प्रश्न सर्वदूर भेडसावत आहे. शहरी व ग्रामीण भागात पाणीपुरवठय़ाचा तथा सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला असल्याने बैठकीच्या सुरुवातीस याच प्रश्नाला थेट हात घालण्यात आला. नवापूर तालुक्यात वीज बिलाच्या रकमेची वसुली कमी असून त्या तुलनेत विजेचा वापर जास्त असल्याने गुणानुक्रमे नवापूरचे स्थान घसरल्याची माहिती सहाय्यक अभियंता राकेश गावीत यांनी दिली. शहरात विद्युत भारनियमन सुरु झाले असून त्याचे वेळापत्रक पाणी पुरविण्यात समस्या निर्माण करीत असल्याचे पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागात विद्युत भारनियमनाच्या व्यतिरिक्तही भारनियमन होत असून संपूर्ण रात्र काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित राहत असल्याच्या तक्रारी आहेत. विद्युत पुरवठय़ाच्या दाबात व नियमिततेत सुधारणा आणाव्यात अशा सूचना आमदार सुरूपसिंग नाईक यांनी केल्यावर शहरी व ग्रामीण विद्युत भारनियमनाचे सुधारित वेळापत्रक तयार करून त्यास मंजुरी घेऊ, असे आश्वासन राकेश गावीत यांनी दिले.
तालुक्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा टंचाईची झळ बसेल हे स्पष्ट असल्याने मध्यम व लघु प्रकल्प तथा साठवण बंधा:यांमधे आज पाण्याचा साठा किती आहे? जून 2019 पावेतो पाण्याचा साठा कसा उपलब्ध राहू शकेल? विसरवाडी व खांडबारा भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्याने वेळीच उपाय योजण्याच्या सूचना आमदार नाईक यांनी केल्या. विसरवाडी व खांडबारा भागातील प्रकल्पांमध्ये असलेल्या पाणीसाठय़ाचे व भेडसावणा:या संभाव्य परिस्थितीचे आताच सर्वेक्षण करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
16 ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने ग्रामीण भागात रस्ते व पुलांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाल्याने क्षतीग्रस्त रस्ते व पूल उभारणी तथा दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती सहाय्यक अभियंता जेरा वळवी यांनी दिली. सद्यस्थितीत नद्या, साठवण बंधारे, लघु व मध्यम प्रकल्पांमधून पाणी वाहून जात असून लोकसहभागातून वनराई बंधारे उभारून ते पाणी अडविण्याची मोहीम प्रत्येक गावात राबविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. कृषी विभागअंतर्गत सुरु असलेले व प्रस्तावित कामांची माहिती व्ही.डी. चौधरी यांनी दिली. तालुक्यातील शेतक:यांना मिळालेल्या कर्जमाफीबाबतची माहिती सहायक निबंधक प्रताप पाडवी यांनी दिली.
तालुक्यात बहुतांश रेशन दुकानात ठराविक नागरिकांना रेशनचे धान्य दिले जाते व इतरांना रेशनचे धान्य मिळतच नाही अशा तक्रारी असल्याने याबाबत लक्ष देण्यात यावे, अशी सूचनाही आमदार नाईक यांनी संबंधितांना दिली.