नुकसानग्रस्त पिकांचे त्वरेत पंचनामे करा, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:33 AM2021-09-21T04:33:56+5:302021-09-21T04:33:56+5:30
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात, तसेच शहादा तालुक्यातील काही भागांत, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वत ...
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागात, तसेच शहादा तालुक्यातील काही भागांत, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेत कपाशी, कांदा, उडीद आदी पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरली आहे. नंदुरबार व शहादा तालुक्यातील जवळ-जवळ ८५ टक्के कपाशी पिकावर लाल्या रोगाने थैमान घातले आहे. कपाशीचे पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, तसेच कांदा पिकाचीही मर रोगामुळे शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. उशिरा आलेला पाऊस, दोन-तीन वेळा केलेली पेरणी, त्यातच आता पिकांवर रोगराईचे थैमान मोठ्या प्रमाणात सुरू असून, शेतकऱ्यांचे थोडेफार काही उत्पन्न येणार होते, तेही रोगराईमुळे उद्ध्वस्त होत आहे. अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांच्या पिकांचे कृषी व महसूल खात्यामार्फत पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा मिळण्यासाठी संबंधित पीक विमा कंपनी व कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात. कृषी खात्यातील अधिकारी व पीक विमा कंपनीचे अधिकारी मुजोर असून, शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे लक्ष देत नाहीत. पिकावर आलेल्या रोगांचे पंचनामे सुरू करून प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याला जागेवर पंचनामा झाल्याची प्रत देण्यात यावी. जेणेकरून पीक विमा कंपनीला धारेवर धरता येईल. वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण तत्काळ कारवाई कराल, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, नंदुरबार तालुकाध्यक्ष योगेश पाटील, तालुका उपाध्यक्ष अशोक पाटील, रवींद्र वळवी, सावळीराम करे, किरण पाटील, प्रताप पाटील, संजय पाटील आदींनी निवेदन दिले आहे.