नंदुरबार जिल्ह्यात कागदावरच कमी होतेय कुपोषण, फेरसर्वेक्षणाच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 11:01 AM2018-07-04T11:01:15+5:302018-07-04T11:11:22+5:30

राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे.

Malnutrition decreases on paper in Nandurbar district, revised up to 4.5 times in review | नंदुरबार जिल्ह्यात कागदावरच कमी होतेय कुपोषण, फेरसर्वेक्षणाच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ

नंदुरबार जिल्ह्यात कागदावरच कमी होतेय कुपोषण, फेरसर्वेक्षणाच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ

Next

- रमाकांत पाटील
नंदुरबार : राज्यात कुपोषणाच्या बाबतीत सर्वात संवेदनशील असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातच प्रशासन कुपोषणाचे प्रमाण कागदावरच कमी होत असल्याचे चित्र उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नव्याने झालेल्या कुपोषित बालकांच्या सर्वेक्षणात अतिकुपोषित बालकांच्या आकडेवारीत साडेचार पटीने वाढ झाली आहे.

सातपुड्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न राज्यातच नव्हे तर देशात गाजले आहेत. येथील कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त येत असल्याने गेल्या काही वर्षापासून कुपोषित बालकांची संख्या आणि बालमृत्यू कागदावरच कमी केले जात असल्याचा संशय वेळोवेळी व्यक्त झाला आहे. गेल्या १५ वर्षांपूर्वी राज्यातील सरासरी बालमृत्यूचे प्रमाण त्याकाळी ४८ असताना नंदुरबार जिल्ह्यातील हे प्रमाण केवळ २१ दाखविण्यात आले होते. त्यावेळी संशय व्यक्त झाल्याने शासनाने दखल घेतली आणि नव्याने सर्वेक्षण झाले तेव्हा ते प्रमाण २१ वरून ५३ वर गेले होते. सध्यादेखील चित्र यापेक्षा वेगळे नाही.

यावर्षी एप्रिल २०१८ मध्ये जिल्ह्यातील अतिकुपोषित बालकांची संख्या केवळ ८२९ होती. प्रशासनानेच यासंदर्भातील वेळोवेळी दिलेल्या अहवालात आकडेवारीत फारसा बदल दिसून येत नव्हता. मात्र प्रत्यक्षात कुपोषणाचे प्रमाण जिल्ह्यात जास्त असल्याच्या तक्रारी वाढल्याने जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कुपोषित बालकांचे नव्याने सर्वेक्षण करून वास्तव अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार जवळपास साडेचार पटीने कुपोषित बालकांची संख्या वाढली आहे.

एप्रिल २०१८ मध्ये धडगाव तालुक्यातील अतिसंवेदनशील कुपोषित बालकांची संख्या ४०९ होती. ती आता एक हजार १७५ झाली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील संख्या १९० होती ती आता ७१६ झाली आहे. तळोदा तालुक्यातील संख्या ८३ होती ती नवीन सर्वेक्षणात ६२७ झाली आहे. शहादा तालुक्यात संख्या केवळ ५९ होती ती आता ७५४ झाली आहे. नवापूर तालुक्यात अतिकुपोषित बालके एप्रिल २०१८ केवळ २१ होती ती आता २८० झाली आहेत तर नंदुरबार तालुक्यात ही संख्या ६७ होती ती आता १३५ झाली आहे. यातही काही केंद्रांचे सर्वेक्षण बाकी आहे. एकूणच एप्रिल २०१८ मध्ये अतिकुपोषित बालके ८२९ होती ती नवीन सर्वेक्षणात तीन हजार ६८७ झाली आहे.
यावरूनच कुपोषणाचे प्रमाण महिला व बालकल्याण विभाग केवळ कागदावरच कमी होत असल्याचे चित्र रंगवत असल्याचे उघड झाले आहे. वास्तविक कुपोषित बालकांचे बारकाईने सर्वेक्षण करून वास्तव चित्र समोर आल्यास प्रभावी उपाययोजना करण्यास प्रशासनाला मदत मिळणार आहे. त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने दखल घेण्याचे आवश्यकता आहे.

Web Title: Malnutrition decreases on paper in Nandurbar district, revised up to 4.5 times in review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.