माणिकराव गावीत यांच्या पुत्राची बंडखोरी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:59 PM2019-03-29T12:59:04+5:302019-04-04T12:25:34+5:30
माणिकराव गावितांची भेट न घेतल्याने नाराजी
नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी करण्यास इच्छुक असलेले भरत माणिकराव गावीत बंडखोरीच्या तयारीत आहेत़ कार्यकर्त्यांचा दबाव पाहता त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात येत आहे़
नंदुरबारच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमदार अॅड़ के़सी़पाडवी व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरत माणिकराव गावीत हे इच्छुक होते़ परंतू पक्षाने आमदार अॅड़ के़सी़पाडवी यांना तिकिट दिले़ मात्र लोकसभा मतदारसंघ ज्यांच्या नावाने ओळखला गेला ते माजी केंद्रीयमंत्री माणिकराव गावीत यांचा जनसंपर्क, आणि सर्वांना सोबत घेत काम करण्याची पद्धत यामुळे तळागाळातील कार्यकर्ते त्यांचे पुत्र भरत गावीत यांच्या उमेदवारीसाठी ंआग्रही होते़ आमदार अॅड़पाडवी यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यानंतरही भरत गावीत यांना उमेदवारी करण्याबाबत कार्यकर्ते गळ घालत होते़ यामुळे त्यांच्याकडून उमेदवारी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असल्याची माहिती असून ३० रोजी तशी घोषणा ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करणार असल्याचे सांगण्यात आले आहे़
माणिकराव गावितांची भेट न घेतल्याने नाराजी
आमदार अॅड़ के़सी़पाडवी यांना काँग्रेसने उमेदवारी जाहिर केल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी नवापूर येथे गेले होते़ याठिकाणी त्यांनी माजीमंत्री आमदार सुरुपसिंग नाईक यांची भेट घेतली होती़ याच शहरात सलग ९ वेळा लोकसभा निवडणूक लढवून विजय मिळवणाऱ्या माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावीत हेही राहतात परंतू आमदार पाडवी यांनी त्यांची भेट न घेतल्याने माणिकराव गावीत परिवाराने नाराजी व्यक्त केली होती़ या नाराजीतूनच भरत गावीत हे अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले आहे़ भरत गावीत हे नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचेही अध्यक्ष आहेत़