बाजारातील गर्दीवर आले नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:28 PM2020-04-23T12:28:42+5:302020-04-23T12:29:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता चारही चौफुली आणि शहरातील उड्डाणपुलावर बॅरीकेडींग करण्यात आल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरात बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता चारही चौफुली आणि शहरातील उड्डाणपुलावर बॅरीकेडींग करण्यात आल्याने गर्दीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळाले. दुसरीकडे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेल्या प्रतिबंधीत क्षेत्रातील अनेकजण बॅरीकेडींग ओलांडून बाजारात खरेदीसाठी येत होते. त्यांना कुठलाही प्रतिबंध केला जात नव्हता.
शहरात सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत काही प्रमाणात संचारबंदीतून शिथीलता दिली जाते. या काळात खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडतात. या नागरिकांवर प्रतिबंधासाठी पोलीस प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा परिणाम होत नसल्याची स्थिती होती. ही बाब लक्षात घेता शहरातील मुख्य मार्गांवरील चारही चौफुलींवर बॅरीकेडींग करण्यात आली आहे. शहरात येणाºया वाहनांना प्रतिबंध करून त्यांना शहरात जाण्याचे कारण विचारले जावूनच सोडले जात आहे. वाघेश्वरी चौफुली, करण चौफुली, सिंधी कॉलनी, नवापूर चौफुलीसह शहरातील उड्डाणपूल आणि नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगदा रस्त्यांचा देखील त्यात समावेश आहे.
यामुळे गर्दीवर बºयापैकी नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. परंतु बाजार समिती आणि खोडाईमाता रस्ते सुरू असल्याने त्या भागातून नागरिक सर्रास येत होते. त्या भागात देखील अडथळे निर्माण करावे अशी मागणी केली जात आहे.
प्रतिबंधीत क्षेत्रात गस्त हवी
प्रतिबंधीत क्षेत्र सील करण्यात आले आहे. ठिकठिकाणी बॅरीकेडींग करण्यात आले आहे. परंतु सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेदरम्यान या भागातील पुरुष, महिला, युवक बॅरीकेडींग ओलांडून सर्रास बाजारपेठेत खरेदीसाठी येत आहेत. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्र सील केल्याचा काहीही उपयोग होत नसल्याची स्थिती आहे. वास्तविक या भागातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सोय करण्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येवून त्यांच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. असे असतांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी सर्रास बॅरीकेडींग ओलांडून ये-जा सुरू आहे.