शहाद्यात शुद्ध पाण्याच्या नावाखाली ‘पाण्या’चा बाजार तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:57 PM2020-12-02T12:57:15+5:302020-12-02T12:57:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : आरओ प्लांट व शुद्ध पाण्याच्या नावाखाली शहरासह तालुक्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय जोरात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : आरओ प्लांट व शुद्ध पाण्याच्या नावाखाली शहरासह तालुक्यात अशुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना केंद्रीय जल आयोग तसेच अन्न व प्रशासन विभागाची मान्यता नाही, तर अनेक प्रकल्पांत नियमानुसार आवश्यक असलेले फार्मासिस्ट, मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळाच अस्तित्वात नाहीत. या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.
सध्या पाण्याची पातळी खालावल्याने अशुद्ध पाणी मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे शहरातील व्यावसायिकांसह घरोघरी आरओ पाण्याचे जार विक्री करणाऱ्यांकडून पाणी मागविले जात आहे. यासाठी पाणी विक्रीच्या व्यवसायात तालुक्यात किमान ७० पेक्षा अधिक उद्योजक कार्यरत आहेत. यापैकी अनेक उद्योजकांकडे परवानाच नाही. आरओ पाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी केंद्रीय जल आयोग तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे, मात्र मोठ्या प्रमाणात शहरासह तालुक्यात विनापरवाना हा उद्योग सुरू आहे. या सर्व प्रकारापासून अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी मात्र अनभिज्ञ असल्याचे निदर्शनास येते तर उद्योजक व या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे हा उद्योग बिनभोबाटपणे सुरू आहे. विशेष म्हणजे पाण्याची शुद्धता शास्रीय पद्धतीने तपासण्याची यंत्रणाच कुठल्याही प्रकल्पात नाही. या उद्योजकांनी अक्षरशः शासनासह नागरिकांची दिशाभूल करून शुद्धतेच्या नावाखाली अशुद्ध पाणीपुरवठा करीत त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा उद्योग सुरू केला आहे.
शहर व तालुक्यात पाण्याचे नैसर्गिक जलस्रोत वापरात नाही. परिणामी बोअरवेलद्वारे पाणी मिळवून त्यावर प्रक्रिया केली जाते. शहादा तालुक्यातील बोअरवेलमधील पाण्यात सर्वाधिक क्षार असल्याने शहर व तालुक्यात किडनीस्टोनच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. बोअरवेलमधील पाण्यातून क्षार, विषाणू, क्लोराईड व अन्य घातक द्रव्य काढणे आवश्यक आहे. त्यानंतरच हे पाणी पिण्यास योग्य होते, मात्र आवश्यक असलेली शास्रीय प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने थंड पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. २० लिटरच्या थंड पाण्याच्या जारसाठी २० रुपये आकारले जातात, तर घरोघरी मोबाइल व्हॅनद्वारे पाच रुपयांत १० लिटर व १० रुपयांत २० लिटर पाणी विक्री केले जाते. नगरपालिकेनेही एका खासगी संस्थेच्या माध्यमातून शहरात महत्त्वाच्या ठिकाणी वाॅटर एटीएमद्वारे अशाप्रकारे सवलतीच्या दरात पाणी उपलब्ध करून दिले आहे.
दिवसभरात शहर व तालुक्यात या व्यवसायातून लाखो लिटर पाण्याची विक्री केली जाते; परंतु पाणी शुद्ध करण्याबाबत आवश्यक असलेली स्वच्छता शास्रीय प्रक्रिया व पॅकिंगसंदर्भातील निकषाची योग्य ती अंमलबजावणी केली जात नसल्याने केवळ थंड पाण्याच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल करून त्यांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने तालुक्यातील सर्व पाणी उद्योग व उद्योजकांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
नियमानुसार पाण्याच्या शुध्दतेसाठी १४ शास्रीय प्रक्रिया व पाणी पिण्यायोग्य होण्याची किमान ३२ प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने मान्यता दिलेले यांत्रिक उपकरण, औषधी वापरणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी डिस्टिल करणे, त्यातील ऑक्सिजनची पातळी, हार्डनेस, पीएच, ओजोन, कलर, जिवाणूंची स्थिती, जडपणा व पाण्यातील टीडीएस कमी करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पात प्रयोगशाळा असणे बंधनकारक आहे. येथे एक निष्णांत मायक्रोबाॅयलाॅजिस्ट व फार्मासिस्ट असणे आवश्यक आहे. मात्र या पाणी उद्योग केंद्रात प्रयोगशाळाच अस्तित्वात नाही. परिणामी येथे निर्माण करण्यात आलेले पाणी पिण्यास योग्य की अयोग्य, असा गहण प्रश्न निर्माण झाला आहे. कुठलीही तपासणी होत नसताना केवळ क्लोरिन वायूचा सर्वाधिक वापर करून पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व परवानगी नसणाऱ्या वॉटर प्लांटवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार संबंधित उद्योजकांकडून कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. नियमबाह्य सुरू असलेले प्लांट सील करण्याची कारवाई पालिका प्रशासनातर्फे लवकरच करण्यात येणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक आरओ पाणी विकणाऱ्या उद्योजकांवर कारवाई केली जाईल. शहरातील ११ आरओ वॉटर प्लांट चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.
-राहुल वाघ,
मुख्याधिकारी, नगरपालिका, शहादा