नंदुरबारात सर्वधर्मीय 84 जोडप्यांचा विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:37 PM2018-05-07T12:37:18+5:302018-05-07T12:37:18+5:30
जिल्हाभरातील दात्यांकडून विविध मदत, शासनाचा उपक्रम
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 7 : सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळयात 84 जोडप्यांचा विवाह लावण्यात आला. यापैकी 44 जोडप्यांनी दहिंदुले, ता.नंदुरबार येथे सकाळी वॉटरकप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदानातही सहभाग घेतला.
जिल्ह्यातील धर्मादाय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, धर्मादाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहिक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मिय सामुदायीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकुण 80 जोडप्यांनी सहभाग नोंदविला होता. परंतु अंतिम दिवसार्पयत एकुण 84 जणांची नोंदणी झाली. शहरातील माळीवाडा परिसरात भव्य मंडप टाकण्यात आला होता. सकाळपासूनच या भागात एकच लगबग सुरू होती. जिल्हाभरातील उपवर व वधू आणि त्यांचे नातेवाईक दाखल होत होते. त्यामुळे या परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. आयोजकांकडून विविध बाबींची सोय या ठिकाणी करण्यात आली होती. सकाळी जोडप्यांची वरात करण्यात आली. त्यानंतर ज्या त्या धर्मानुसार व जातीरिवाजानुसार विवाह लावण्यात आले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार डॉ.विजयकुमार गावीत, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे, पोलीस अधीक्षक संजय पाटील, सहायक धर्मादाय आयुक्त सुधीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत गजेंद्र शिंपी, पंडित माळी, देविसिंग राजपूत, डॉ.तेजल चौधरी, सुलभा महिरे, सुभाष पानपाटील, डॉ.भरत वळवी, परवेजखान, शनिश्वर मंदीर ट्रस्ट, गोपाळ शिंपी, हिरालाल माळी, सारंगखेडा श्री दत्त मंदीर ट्रस्ट, व्ही.सी.चौधरी, अॅड.गौतम पावरा, रवींद्र शिंपी, रऊफ शेख, सतिष लाड
जि.प.सदस्य अभिजीत पाटील यांनी दोन लाख 51 हजार रुपये देणगी दिली. एन.टी.व्ही.एस. संस्थेकडून 51 हजार रुपये, गोपाल शर्मा यांच्याकडून वधू-वरांना कपडे देण्यात आले. शनैश्वर मंदीर शनिमांडळ संस्थेकडून मंगळसूत्रासाठी 31 ग्रॅम सोने तर हिरा ग्रृपतर्फे 15 ग्रॅम सोने देण्यात आले. राजेंद्रकुमार गावीत व आदिवासी देवमोगरा संस्थेकडून सर्वच जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहरातील मतदार यादीत नाव असलेल्या सर्वच उपवर व वधूंना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे जाहीर केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते जोडप्यांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी बोलतांना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले, जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानाची गोष्ट आहे. आयोजक समितीने देखील मेहनमत घेवून सोहळा यशस्वीपणे पार पाडला. पुढील वर्षी किमान 200 जोडप्यांचा सहभाग राहील यादृष्टीने नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वैदीक पद्धतीने विवाह वसंत उदारे व कमलेश पंडित यांनी पार पाडला. सूत्रसंचलन रणजित राजपूत यांनी केले.