मंदाणे व पुसनद गावात उपाययोजना सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 01:03 PM2020-07-17T13:03:52+5:302020-07-17T13:03:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मंदाणे/सारंगखेडा : शहादा तालुक्यातील मंदाणे व पुसनद येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने दोन्ही गावांमध्ये उपाययोजना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मंदाणे/सारंगखेडा : शहादा तालुक्यातील मंदाणे व पुसनद येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने दोन्ही गावांमध्ये उपाययोजना करण्यात येत आहेत. मंदाणे येथे पुन्हा रुग्ण आढळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुसनद येथील रुग्णाच्या एका जणास विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले तर पाच जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शहादा तालुक्यातील मंदाणे येथे एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा घबराट निर्माण झाली. ग्रामपंचायतीमार्फत तात्काळ गावात औषध फवारणी करण्यात आली असून संबंधित क्षेत्र प्रतिबंध करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीसह प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी उपाययोजना करीत आहेत.
मंदाणे गावात २८ दिवसांपूर्वी एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ही महिला कोरोनामुक्त झाल्याने ग्रामस्थांनी नि:श्वास सोडला होता. सद्यस्थितीत गाव कंटेनमेंट झोनपासून मुक्त होईल असे वाटत असतानाच बुधवारी पुन्हा एक ५५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आल्याने गावात पुन्हा एकच खळबळ उडाली. संबंधित रुग्णाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले आहे. तर त्यांच्या अतिसंपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सरपंच विजय सनेर, वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी दिनेश पाटील, पोलीस पाटील सुभाष भिल, ग्रामपंचायत सदस्य किरण मोरे, शरद साळुंखे, दिनेश पवार, महेंद्र पवार, ग्रामपंचायत कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा कार्यकर्ती आदींनी गावात फिरून घाबरून न जाता नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले. कोणत्याही प्रकारचा आरोग्यासंबंधी त्रास झाल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. गावात ठिकठिकाणी रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्यात आले असून अत्यावश्यक सेवा वगळून गावातील व्यवहार, दुकाने बंद करण्यात आले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी तळ ठोकून असून पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या शोध घेतला जात आहे.
शहादा तालुक्यातील मंदाणे येथील रहिवासी व सध्या शहाद्यातील वृंदावननगरात वास्तव्यास असलेल्या एका ६७ वर्षीय वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. हा वृद्ध पुसनद, ता.शहादा येथेही मुक्कामी राहिल्याने त्याच्या आठ वर्षीय नातीचा अहवालही पॉझिटीव्ह आल्यानंतर त्या मुलीच्या संपर्कातील एका व्यक्तीला क्वारंटाईन करून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर कुटुंबातील पाच लोकाना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या असल्या तरी आरोग्य विभागाकडून अद्याप सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आलेली नाही.
पुसनद ग्रामपंचायतीतर्फे उपाययोजना करून गावात संबंधित भाग सील करण्यात येऊन औषध फवारणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामस्थांना स्थानिक प्रशासनाकडून विविध जनजागृतीपर सूचना देण्यात आल्या. वास्तविक संबंधित पॉझिटीव्ह झालेल्या व्यक्तीकडून कुठे संसर्ग वाढू नये म्हणून तात्काळ सर्वेक्षण करण्याचे गरजेचे असताना आरोग्य विभागाने कोणतीही उपाययोजना अद्यापपर्यंत सुरू करण्यात आलेली नाही. या रुग्णाच्या संपर्कातील एका जणास गुरुवारी विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले व संपर्कातील पाच लोकांना होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यापुरते आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते. मात्र गावात सर्वेक्षण किंवा जनजागृती न केल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असतात्यांच्याकडे पूर्णत: माहिती उपलब्ध नव्हती. याउलट त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे सरपंच मीनाक्षी गिरासे, उपसरपंच मंगला पाटील, उदेसिंग गिरासे, अरविंद पाटील, पोलीस पाटील कृष्णा कोळी आदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.