म्हसावद-सुलतानपूर रस्ता दुरवस्थेने वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 05:06 PM2020-01-08T17:06:32+5:302020-01-08T17:06:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद ते सुलतानपूर रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून वाहन चालवावे कसे? असा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : शहादा तालुक्यातील म्हसावद ते सुलतानपूर रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून वाहन चालवावे कसे? असा प्रश्न वाहन चालकांना निर्माण झाला आहे. डांबरीकरण रस्ताच गायब झाला असून मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले असून या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे.
मध्यप्रदेश राज्याला जोडणारा म्हसावद भागातून हा एकमेव रस्ता आहे. पावसाळा संपण्यापूर्वी दरा फाटा ते खेतिया रस्त्याचे रुंदीकरण सुरू असल्याने त्या रस्त्याची वाहतूक म्हसावद-सुलतानपूर या रस्त्याने वळविण्यात आली होती. एकेरी असलेला हा रस्ता अवजड वाहनांमुळे पूर्णत: उखडून गेला असून मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. डांबरीकरणाचा रस्ता मातीचा बनला आहे. उंचवटे आणि खड्डे यामुळे वाहनचालकाला वाहन चालवावे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यापासून रस्त्याची दुरूस्ती न केल्यामुळे रस्ता उखडून मातीचा झाल्याने धूळ ऊडते. ऊस-कापूस भरून जाणारी वाहने खड्डे व उंचवटे यामुळे उलटून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे-झुडपे वाढून रस्ता अरूंद व एकेरी झाला आहे. मात्र रस्त्याच्या दुर्दशेकडे संबधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्याची दुरूस्ती करून नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी जनतेने केली आहे.