म्हसावदची केळी सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:13 PM2018-04-07T13:13:34+5:302018-04-07T13:13:34+5:30
तंत्रशुद्ध पद्धतीने पॅकींग : आधुनिक तंत्रज्ञान व परिश्रमाची जोड; केळीची परदेशात निर्यात
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 7 : म्हसावद, ता.शहादा येथील केळी प्रथमच इराण, इराक व दुबईला पोहोचणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान व परिश्रमाच्या जोरावर म्हसावद येथून केळीची निर्यात सातासमुद्रापार झाली आहे.
येथील प्रगतीशिल शेतकरी विठ्ठल हिरजी चौधरी, रमाकांत चौधरी यांनी जी-नऊ जातीच्या केळीची सहा एकरात लागवड केली आहे. या वेळी आधुनिक कृषी तंत्रज्ञानासह परिश्रम व कृषीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केळीचे चांगले उत्पादन घेतल्याचे सांगितले. दरम्यान, प्रत्यक्षात क्षेत्रावर भेट दिली असता निर्यात होणारी केळी तंत्रशुद्ध पद्धतीने भरली जात होती. केळी क्षेत्रातून घड कापून आणल्यावर स्वच्छता करणे, निकामी भाग काढून जमिनीला न टेकता विशिष्ट मिश्रण केलेल्या द्रावणात बुडवून हवाबंद पिशवीत केळीची पॅकींग केली जात होती. ही केळी इराण, इराक व दुबईला पोहोचण्यासाठी 35 ते 45 दिवस लागतात. त्या दरम्यान केळी पिकत नाही. जशीच्या तशी ताजी राहते. यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे मुंबई सटस् अॅग्रोटेकचे मॅनेजर अखिलेश पाटील यांनी सांगितले. येथून केळी बारामती येथील कोल्ड स्टोरेजमध्ये पाठविण्यात येणार असून, तेथून मुंबई येथे पाठविली जाते. त्यानंतर समुद्र मार्गाने दुबई, इराक व इराण याठिकाणी केळीची निर्यात होणार असल्याचे सांगितले.
ब्राrाणपुरी येथील डिगंबर पाटील, सुलवाडे येथील अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माल निर्यात होत असल्याचे संबंधितांनी सांगितले. सरासरी 900 ते एक हजाराचा भाव देवून अधिक फरक मिळत असून, 12 टन माल निर्यात करण्यात आला.