स्थलांतरामुळे खोडसगाव पडले ओस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 12:00 PM2019-12-04T12:00:57+5:302019-12-04T12:01:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नेहमीच गजबजणारे खोडसगाव ता. नंदुरबार येथील बहुतांश नागरिक रोजगारानिमित्त परराज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नेहमीच गजबजणारे खोडसगाव ता. नंदुरबार येथील बहुतांश नागरिक रोजगारानिमित्त परराज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या गावात शुकशुकाट दिसून येत आहे.
नंदुरबार तालुक्यातील खोडसगाव या गावात तसे विविध समाजाचे वास्तव्य आहे. असे असले तरी तेथे नेहमीच सौख्याचे वातावण दिसून येते. शिवाय समाज अथवा जातीचा कुठलाही विचार न करता एकमेकांना सहकार्य करण्याची भूमिका प्रत्येक समाज बांधव पार पाडत आहे. हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने फारसे मोठे नसून तेथील लोकसंख्या एकुण एक हजार ३६१ असल्याचे आढळून आले आहेत. तत ७०३ पुरुष तर ६५८ महिलांचा समावेश आहे.
खोडसगाव परिसरात काही प्रमाणातील शेतीची कामे वगळता अन्य कुठलीही कामे नसल्यामुळे तेथील मजूरांना स्थानिक ठिकाणी वेळेवर व अपेक्षेनुसार रोजगार मिळत नाही, तर दुसऱ्या बाजूने गुजरातमध्ये निश्चितच रोजगार मिळतो शिवाय तो रोजगार समाधानकारकही असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे खोडसगाव येथील बहुसंख्य मजूर सौराष्टÑात स्थलांतरीत झाले आहेत. परिणामी खोडसगाव येथे सद्यस्थितीत शुकशुकाट दिसून येत आहे. नेहमीच गजबजणाºया या गावात प्रत्येक गल्ल्यांमध्ये ठराविकच नागरिक दिसून येत आहे. हे नागरिक घराचा सांभाळ करण्यासाठी तसेच काही पशुधनाच्या सेवेसाठी थांबल्याचे सांगण्यात आले.
सौराष्टÑात आॅक्टोबरमध्ये भूईमुगच्या शेंगा काढण्यात येत होत्या. त्यानंतर भात कापणीला सुरुवात झाली. भात कापणीचा हंगाम आटाक्यात आला असतानाच पुन्हा कापूस वेचणीला सुरुवात झाली. त्यामुळे तेथे रोजगार सहजच उपलब्ध होत असल्याचे म्हटले जात आहे. कापूस वेचणीशिवाय गुजरातमध्ये ऊसतोड कामासाठी देखील अपेक्षेनुसार रोजगार उपलब्ध होत आहे. त्यामुळे खोडसगाव येथील मजूर तेथे स्थलांतरीत झाल्याचे म्हटले जात आहे.
खोडसगावसह त्या परिसरातील अन्य गावांमधूनही बहुसंख्य मजूर स्थलांतरीत झाल्याचे आढळून आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या या स्थलांतरामुळे शासनाकडूनही रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला नसावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. अशा स्थलांतरामुळे या मजूर बांधवांमध्ये काही समस्या निर्माण होतात. अशा समस्यांमधून या मजूरांची सुटका करण्यासाठी किंवा समस्याच उदघभवू नये, यासाठी प्रशासनामार्फत विशेष काळजी घेणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन स्थरावरुन याबाबत कुठल्या उपययोजना करण्यात येतात, याकडे लक्ष लागले आहे.
खोडसगाव येथे जिल्हा परिषदेची मराठी शाळा सुरू करण्यात आली असून सद्यस्थितीत तेथे पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू आहे. तेथे एकुण १८४ विद्यार्थी असल्याचे आढळून आले आहेत. एकुण विद्यार्थ्यांपैकी गुजरातमध्ये स्थलांतरीत झालेल्या पालकांसोबत १४ विद्यार्थी देखील स्थलांतरीत झालेत. परंतु हे विद्यार्थी अधूनमधून त्यांच्या अजी-आजोबांकडे परत येतही असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे शैक्षणिक नुकसान होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.