पर्यटन मंत्र्यांच्या गावात आरोग्यसेवेचा बोजवारा
By admin | Published: April 5, 2017 05:18 PM2017-04-05T17:18:48+5:302017-04-05T17:18:48+5:30
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडाईचा या गावातील उपजिल्हा रुग्णालयात विविध अडचणी असल्याने आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे.
Next
दोंडाईचा,दि.5 : राज्याचे रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या गावातील प्रशस्त व विविध सोयींनी युक्त असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात कायमस्वरूपी मुख्य वैद्यकीय अधीक्षकासह नऊ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिका:यांची सात पदे मंजूर असताना केवळ चारच पदे भरली आहेत. वैद्यकीय अधिका:यांच्या कमतरतेमुळे रुग्णावर विविध उपचार, शस्त्रक्रिया होत नसून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र दिसून येत आहे.
शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात चौदा वर्षापूर्वी उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. दोंडाईचा हे गाव धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी राज्य महामार्ग क्रमांक एकवर आहे.
मागणी करूनही दुर्लक्ष
जिल्हा शल्यचिकित्सक व नाशिकच्या आरोग्य उपसंचालकांकडे उपजिल्हा रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी करूनही अद्याप वैद्यकीय अधिका:यांची नेमणूक झालेली नाही. परिणामी, रुग्णांना अपेक्षित असलेली सेवा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
केवळ एकच पद भरले
नाशिकच्या आरोग्य उपसंचालक एल.आर. घोडके यांनी 22 फेब्रुवारीला दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयास भेट दिली होती. त्यांनी पुरेसे वैद्यकीय अधिकारी इतर सुविधा, सुधारणा करण्याचे मान्य केले होते. त्यामुळे समाधानाची बाब म्हणजे एका वैद्यकीय अधिका:याची नेमणूक केली असून अजुनही नऊ पदे रिक्त आहेत .
दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. रुग्णालय स्थापनेपासून 46 पदे मंजूर आहेत. त्यात डॉ.ललित चंद्रे यांची प्रभारी मुख्य वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहात आहेत. रुग्णालय स्थापनेपासूनच कायम वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक नाही. वर्ग दोनच्या सात वैद्यकीय अधिका:यांपैकी फक्त चारच अधिकारी कार्यरत आहेत. त्यात डॉ. ललित चंद्रे, डॉ. सचिन पारख, डॉ. जयेश ठाकूर व आता नव्याने रुजू झालेले डॉ.अनिल भामरे असे चार वैद्यकीय अधिकारी आहेत.
महिलांच्या समस्या सोडवण्यात अडचण
आजही स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ अस्थीरोगतज्ज्ञ, दंतचिकीत्सक रुग्णालयात नाही. त्यामुळे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवण्यास अडचण येते. स्त्री रोग तज्ज्ञ नसल्याने येथे तपासणी होत नाही. त्यामुळे पीडितास धुळे येथे पाठवावे लागते. रुग्णालयात सर्जन व भुलतज्ज्ञ नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया होत नाही. महिला व पुरुष शस्त्रक्रियाही जेमतेम होतात. बालरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञ, अस्थी तज्ज्ञ नसल्याने अपघातग्रस्त रुग्णांना तत्काळ उपचार करण्यासाठी धुळे येथे पाठवावे लागते. त्यामुळे अनेकदा रुग्ण मरण पावल्याचे दिसते.
क्ष किरण मशीन गेल्या वर्षापासून नादुरुस्त होते. ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित केल्यावर नवीन मशीन व तंत्रज्ञ यांची नेमणूक झाली आहे. रुग्णालयात ईसीजी मशीन अद्याप नादुरुस्त आहे. मात्र ईसीजी टेक्निशियन आहे.
उपजिल्हा रुग्णालयात प्रयोग शाळा तंत्रज्ञ नाही. बारा परिचारिकांपैकी एक अन्यत्र ठिकाणी कामावर, एक बाळांतपणाच्या रजेवर, दोन पदे रिक्त असे आठ जण आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, सहाय्यक अधिसेविका, परिसेविका ही पदे रिक्त आहेत. अशी नऊ पदे रिक्त आहेत. रिक्त पदाचा वैद्यकीय सेवेवर परिणाम होत आहे.
उष्माघात कक्ष स्थापन
वाढते तापमान लक्षात घेऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललित चंद्रे यांनी उषामाघात कक्षाची निर्मिती केली आहे. कक्षात पुरेशी सोय केली आहे. अद्याप उष्माघात रुग्ण न आल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयात रुग्णांसाठी बरीच यंत्र सामुग्री, साधने आहेत. परंतू पुरेशा प्रमाणात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी नसल्याने असलेल्या डॉक्टरांनाही रुग्णांवर उपचार करताना अडचणी येत आहेत.
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कायम स्वरूपी वैद्यकीय अधीक्षकाची नेमणूक करावी. बालरोग, स्त्रीरोग, अस्थीतज्ज्ञ , भूल तज्ज्ञ आदींसह चार वैद्यकीय अधिका:यांचीही नेमणूक करावी. येथे कार्यरत परिचारीकेला मद्यपींनी दमबाजी केली. रुग्णालयात धिंगाणा घातला. त्यामुळे येथे पोलीस संरक्षण मिळणे गरजेचे आहे. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.पी. सांगळे व नाशिकच्या आरोग्य उपसंचालिका डॉ.एल.आर. घोडके यांच्याकडे रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व इतर कर्मचारी नेमणुकीची मागणी केली आहे. दोंडाईचा पोलीस निरीक्षक प्रकाश मुंढे यांच्याकडे पोलीस बंदोबस्त मागितला आहे. अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
- डॉ.ललित चंद्रे,
प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय