म्हसावद शिवारात बिबटय़ा दिसल्याने मजुरांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:08 PM2017-11-07T12:08:13+5:302017-11-07T12:08:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसावद : बुडीगव्हाण रस्त्यावर म्हसावद शिवारात कापसाच्या शेतात बिबटय़ाने कोल्हा फस्त केल्याची घटना घडली. या शेतात मजूर कापसाची वेचणी करीत असताना अचानक समोर बिबटय़ा आल्याने महिला मजुरांची धावपळ उडाली.
याबाबत वृत्त असे की, सोमवारी सकाळी नऊ वाजता बुडीगव्हाण रस्त्यालगत म्हसावद शिवारात बाबू ओंकार चौधरी, हेमराज बाबू चौधरी यांच्या शेतात कापूस वेचणी सुरू होती. कापूस वेचणी सुरू असताना शेताच्या मध्यभागी आल्यावर अचानक बिबटय़ा मांस खाताना मजुरांना दिसला. त्याला पाहून महिला मजुरांनी आरडाओरड करीत पळ काढला. बिबटय़ाही तेथून उसाच्या शेतात घुसला. बिबटय़ाने कोल्ह्याची शिकार करून त्याचे मांस या शेतात खात असताना मजुरांना दिसला. रविवारी रात्रीही शेतमालकास बिबटय़ा शेताच्या बांधावर दिसला होता तर 15 दिवसांपूर्वी राजाराम नथ्थू पाटील हे पहाटे व्यायामासाठी गेले असता रस्त्यालगत पपईच्या शेताच्या बांधावर दिसला होता.
या परिसरात बिबटय़ाचे वास्तव्य असताना वनविभाग मात्र सुस्त झाला आहे. 15 दिवसांपासून एकाच ठिकाणी आढळून येत असलेल्या बिबटय़ाचा बंदोबस्त करतील की मानवी बळी घेण्याची वनविभाग वाट पाहत आहे, असा संतप्त सवाल शेतक:यांनी उपस्थित केला आहे.