मोड पुनर्वसन वसाहतीचा संसार पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 12:55 PM2019-08-11T12:55:44+5:302019-08-11T12:55:50+5:30
वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन ...
वसंत मराठे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पुराचे पाणी वसाहतीतील घरांमध्ये शिरुन मोड येथील प्रकल्प बाधीतांचा संपूर्ण संसारच वाहून गेला. घरांमधील पाणी ओसरल्यानंतर आता पुन्हा नव्याने संसार उभा करण्याचा मोठा प्रश्न या बाधीतांपुढे पडला आहे. शासनाने निदान पुरेसे रेशन व तातडीने आर्थिक मदत देण्याची अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली.
सरदार सरोवर प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी, बामणी, डनेल या गावांमधील 38 कुटुंबांचे पुनर्वसन तळोदा तालुक्यातील मोड गावाजवळील वसाहतीत गेल्या जून महिन्यात करण्यात आले आहे. गुरुवारी व शुक्रवारी संपूर्ण तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसाहतीपासून अवघ्या 500 फूट अंतरावर असलेल्या निझरा नदीच्या पुराचे पाणी संपूर्ण वसाहतीत शिरले. घरांमध्ये अक्षरश: तीन ते चार फुटार्पयत पाणी शिरल्याने साठवलेले गहू, ज्वारी, मका, सोयाबीन, तांदूळ यासह भांडी, कपडे व इतर साहित्य वाहून गेले. प्रशासनाने या कुटुंबांचे मोड येथील शाळेत स्थलांतर करुन तेथे भोजनाची व्यवस्था केली होती. शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबरच घरांमधील पाणीही ओसरले होते. त्यामुळे हे विस्थापित कुटुंबही पुन्हा आपल्या घरांकडे परतले. मात्र त्यांचा संपूर्ण संसारच वाहून गेला होता. घरांमध्ये केवळ गुडघाभर मातीचा गाळ साचला होता. मोड येथील सरपंच जयसिंग माळी यांनी त्यांना दाळ, तांदूळ, तेल व किराणा माल उपलब्ध करून दिल्यानंतर या बाधितांनी सामूहिक भोजन तयार करून एकत्र जेवण केले. त्यानंतर हे सर्व कुटुंब आपापल्या घरात साचलेला गाळ काढण्यात मग्न झाली होती. पुराच्या पाण्याने आपला संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाल्याचे दु:ख त्यांच्या चेह:यावर स्पष्ट दिसून आले. आता पुन्हा नवीन संसार कसा उभा करावा, अशी व्यथाही त्यांनी बोलून दाखवली. निदान शासनाने पुरेसे रेशन व तात्काळ आर्थिक मदत देण्याची अपेक्षा रमेश वसावे या बाधिताने बोलून दाखवली. नर्मदा विकास विभागाचे काही कर्मचारी मदतीसाठी उपस्थित असून जेसीबी मशीनच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते. आधीच वसाहतींमध्ये पाणीपुरवठा व वीज याव्यतिरिक्त कुठलीच सुविधा नाही. कच्चे रस्ते आहेत, गटारी नसल्याने पाण्याचा निचरा होत नाही. शासनाने घरांच्या प्लींथसाठी रक्कम मंजूर केली असली तरी जून महिन्यात त्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामुळे घराचा पाया कसा बांधला जाईल, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या नदीचा प्रवाहच काही शेतक:यांनी बंद केल्यामुळे पुराचे पाणी वसाहतीत शिरल्याचे या कुटुंबांनी सांगितले. त्याचबरोबर शासनाने घरकूल योजनेतून पक्की घरे बांधून द्यावी, अशी मागणीही केली आहे. विशेष म्हणजे पावसामुळे तीन-चार दिवसांपासून वीजपुरवठाच खंडित झाल्यामुळे कौलारू छपरावरुन येणारे पावसाचे पाणी ते पिण्यासाठी वापरत असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद शाळा, दवाखाना आदी सुविधाही तेथे नसल्याचे दिसून आले.