जिल्हाभरात 50 पैशांपेक्षा अधीक पैसेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:53 PM2017-11-02T12:53:25+5:302017-11-02T12:53:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सुधारीत हंगामी पैसेवारी जाहीर करतांना देखील 50 पैशांच्या वरच जाहीर केल्याने यंदा देखील जिल्ह्यातील एकही गाव दुष्काळी राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. वास्तविक नंदुरबारचा पूव्रेकडील भाग आणि शहादा तालुक्यातील तापी पट्टयाच्या भागात पीक परिस्थिती समाधानकारक नसतांनाही पैसेवारीबाबत अन्याय झाल्याची भावना या भागातील शेतक:यांची आहे.
जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला असला तरी उशीराने पावसाचे आगमन आणि त्याची अनियमितता यामुळे पिकांवर परिणाम झाला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या पावसाने नंतर मध्यंतरी दोन ते तीन आठवडे दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागातील शेतक:यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागत होते. त्यानंतरही पिकांना आवश्यक त्या वेळी पावसाचा खंड पडत असल्यामुळे नंदुरबार तालुक्यातील पूर्व भाग, शहादा तालुक्यातील अनेक भागात पिकांची वाढ खुंटली होती. परिणामी यंदा उत्पादकता देखील कमी झाली आहे. असे असतांना पैसेवारी सरसकट 50 पैशांपेक्षा अधीक लावण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
खरीपची 856 गावे
जिल्ह्यात खरीप हंगामाची एकुण 856 गावे आहेत. त्यात सर्वाधिक 194 गावे ही अक्कलकुवा तालुक्यातील आहेत. त्या खालोखाल 165 गावे ही नवापूर तालुक्यातील आहेत. नंदुरबार तालुक्यात 145, तळोदा तालुक्यात 93, शहादा तालुक्यात 160 तर धडगाव तालुक्यात 99 गावे आहेत. या सर्वच गावांची पैसेवारी 55 ते 65 पैसे दरम्यान आहे.
रब्बीच्याही गावांचा समावेश
हंगामी पैसेवारी जाहीर करतांना रब्बीच्या गावांचाही समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात रब्बीची एकुण 30 गावे आहेत. त्यात नंदुरबार तालुक्यातील दहा व शहादा तालुक्यातील 20 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये देखील रब्बीचा पेरा झाल्यामुळे त्यांचाही खरीप सुधारीत पैसेवारीत समावेश करण्यात आला आहे.
अन्यायाची भावना
प्रशासनाने स्थानिक पीक परिस्थिती लक्षात न घेता पैसेवारी जाहीर केल्यामुळे दुष्काळसदृष्य गावांवर अन्याय झाल्याची भावना शेतक:यांची आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीचा 89 टक्के पाऊस झाला. सर्वच तालुक्यांमध्ये सरासरीचा 85 टक्केपेक्षा अधीक पाऊस झाल्याची नोंद आहे. परंतु सर्वच भागात एक समान पाऊस झालेला नाही.
नंदुरबार तालुक्यातील पूव्रेकडील रनाळे, शनिमांडळ मंडळात ही स्थिती आहे. अनेक पिकांची उत्पादकता कमी झाली आहे. शहादा तालुक्यात देखील यंदा सरासरीचा केवळ 78 टक्के पाऊस झाला आहे.
सारंगखेडा व वडाळी मंडळात पावसाची अनियमितता कायम होती. त्याचा परिणाम पिकांवर झाला. जे थोडेफार पीक हाती येणार होते ते देखील परतीच्या पावसाने हिरावून नेले. परिणामी या भागात देखील पीक परिस्थिती फारशी समाधानकारक नव्हती. असे असतांनाही त्या भागात देखील सरसकट 50 पैसेपेक्षा अधीक पैसेवारी जाहीर झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.