सर्वाधिक ‘बीपी’चे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 12:41 PM2020-10-08T12:41:08+5:302020-10-08T12:41:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यत सर्वाधिक बीपी अर्थात रक्तदाबाचे रुग्ण तर त्या खालोखाल मधुमेही रुग्ण आढळून आले आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यत सर्वाधिक बीपी अर्थात रक्तदाबाचे रुग्ण तर त्या खालोखाल मधुमेही रुग्ण आढळून आले आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत या बाबी समोर आल्या आहेत.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने सुरू केलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम उपयुक्त ठरत असून त्याअंतर्गत ११०० व्यक्तींना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. यापैकी ७३४ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून त्यातील ८२ व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात १८ लाख ७२ हजार लोकसंख्येपैकी १६ लाखाहून अधिक नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यातआले आहे. यात अक्कलकुवा दोन लाख ३४ हजार, धडगाव दोन लाख २१ हजार, नंदुरबार तीन लाख ४१ हजार, नवापूर दोन लाख ४७ हजार, शहादा तीन लाख ८५ हजार आणि तळोदा तालुक्यातील एक लाख ७० हजार नागरिकांचा समावेश आहे. त्यासाठी तीन लाख ५३ हजार घरांना आरोग्य पथकांनी भेटी दिल्या. जिल्ह्यातील दुर्गम भागातही पथकांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली आणि कोरोनाबाबत दक्षतेच्या सूचना दिल्या.
जिल्ह्याने आॅनलाईन नोंदणीतही चांगली कामगिरी केली असून ७० टक्के नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे. या कामगिरीच्या बाबतीत जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. आरोग्य पथकांनी अनेक अडचणीतून मार्ग काढत कोरोना प्रतिबंधासाठी घरोघरी जावून नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे.
वेळीच नागरिकांना संदर्भित केल्याने आणि त्यांची कोरोना चाचणी केल्याने संसर्ग बऱ्याच अंशी रोखण्यात प्रशासनाला मदत होणार आहे. मोहिम यशस्वी करण्यासाठी अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि स्वयंसेवी संस्थांनी आरोग्य पथकांना सहकार्य केले.
काही गावांनी नागरिकांचे समुपदेशन करून स्वॅब चाचणी शिबिरांचेदेखील संयोजन केले. या एकत्रित प्रयत्नांमुळे कोरोना बाधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्य झाले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आरोग्य विभागाला इतर आजारांच्या मोहिमांबाबतही मदत होणार आहे.
- सर्वेक्षण केलेल्या नागरिकांपैकी सात हजार ६८९ व्यक्तींना रक्तदाब,
- १५९ कर्करोग,
- पाच हजार ५८५ जणांना मधुमेह,
- इतर आजार १,२३१.
- २९६ व्यक्तींना खोकला असल्याचे आढळून आले. त्यांना कोरोना संसगार्पासून दूर राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.
- २७४ व्यक्तींना ताप, ३४ घसादुखी तर ७२ व्यक्तींमध्ये एसपीओ-२ चे प्रमाण ९५ पेक्षा कमी आढळले.
- या सर्वांपैकी ११०० रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. स्वॅब चाचणीसाठी मोबाईल पथकांचे सहकार्य घेण्यात आले.
- काही भागात सर्व्हेक्षणासाठी पथकेच आली नसल्याच्या तक्रारीही होत्या. विशेषत: शहरी भागात घर बंद असल्यास पुन्हा पथक आले नाही. काही ठिकाणी एकाच जागी बसून सर्व्हेक्षण झाल्याचेही बोलले गेले. जर शहरी भागात आणखी गांभिर्याने ते झाले असते तर आणखी रुग्ण आढळून आले असते. त्यामुळे सर्व्हेक्षणात काही त्रुटी राहिल्याचेही चित्र आहेच.