आईने वाचविले ‘हिरा’ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:01 AM2017-09-04T01:01:38+5:302017-09-04T01:03:25+5:30
पालकांनी तरसाच्या तोंडातून बालकाला वाचवले हिमतीने : वनविभागाने घेतले ठसे
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : मध्य प्रदेशातील खेतिया येथे आठवडे बाजारासाठी जात असताना तरसाने केलेल्या हल्ल्यात सहा वर्षीय बालक जखमी झाला़ त्याच्या पालकांनी तरसाचा मोठ्या हिमतीने सामना करून मुलाला मृत्यूची दाढेतून बाहेर काढले़
पहलानी (मलगाव) येथील रहिवासी पांडू अमदिया, पत्नी तिरमाबाई आणि मुलगा हिरा हे तिघे पहाटे साडेपाच वाजता खेतिया येथे पायी जात असताना मलगाव-खेतिया रस्त्यावरील उद्धव यादव पाटील यांच्या शेताजवळ शिकारीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरसाने सहा वर्षीय हिरावर हल्ला केला.
खेतिया येथील सहायक वनपरिक्षेत्र अधिकारी राजकमल आर्य व त्यांच्या सहकाºयांनी रुग्णालयात जाऊन सहा वर्षीय हिराची प्रकृती जाणून घेतली़ यानंतर वनाधिकारी व कर्मचाºयांनी हल्ला झालेल्या ठिकाणी तरसाच्या पावलांचे ठसेही घेतले़
या घटनेनंतर वनविभागाकडून या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावून या भागातील वन्य प्राण्यांची माहिती संकलित करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे़
असा वाचविला ‘हिरा’
हिरा याचा हात जबड्यात धरून तरसाने ओढण्यास सुरुवात केली़ ते पाहून पालकांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली़ दोघांनी प्रसंगावधान राखत दगड आणि काठीने तरसावर हल्ला केला़ तिरमाबाईच्या हातून सुटलेला एक दगड तरसाच्या जबड्याला बसल्याने त्याने हिराचा हात सोडून पळ काढला़ २० मिनिटे सुरू असलेल्या या लढाईत हिराला खोल जखमा झाल्या आहेत़ त्याच्यावर खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर इंदूर येथे हलवण्यात आले आहे़